लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.१२) पुण्यात प्रशासकीय बैठक घेत आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढताना आता पुन्हा लॉकडाऊन नको, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे. या मागणीचे निवेदन अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सरचिटणीस महेंद्र पितळीया यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. शहरात कोरोना आपत्तीमुळे यापूर्वी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गासह त्यांचे वीस लाखांहून अधिक कुटुंबीय आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. आता कुठे व्यापार सुरळीत होत आहे, मात्र अद्यापही तो पूर्ववत झालेला नाही. अशावेळी पुन्हा लॉकडाऊन करणे योग्य नाही, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे.
केवळ बाजारपेठा बंद करणे हा कोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय नसल्याचेही महासंघाने म्हटले आहे. मोठमोठ्या पंचतांराकित हॉटेलांमधील विवाह समारंभावर कोणाचेही नियंत्रण नाही. मोठ्या प्रमाणात नागरिक विनामास्क फिरताना दिसतात पण त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याबद्दलही महासंघाने तक्रार केली आहे़
आजमितीला शहराच्या मध्यवर्ती भागात नव्हे तर उपनगरांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. परंतु, याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात असे सांगून, व्यापारी महासंघाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करू नये. निर्बंध लादण्यापूर्वी व्यापाऱ्यांशीही चर्चा करावी, अशी मागणी केली आहे़