दौैंड : तालुक्यातील नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी आता बाहेरगावी जावे लागणार नाही. दरम्यान, आधारकार्डची सुविधा दौैंड येथील तहसील कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी केले आहे.
दौैंड शहर आणि तालुक्यात आधारकार्ड काढण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे नागरिकांना बाहेरगावी जाऊन आधारकार्ड काढावे लागत होते. परिणामी वेळ आणि पैैसा वाया जात होता. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील आधारकार्डची समस्या नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी मांडली. त्यानुसार संबंधित खात्याकडे सातत्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे आधारकार्ड केंद्र तातडीने नवीन प्रशासकीय इमारतीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. त्यानुसार प्रशासकीय इमारतीत आधारकार्ड केंद्राचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अॅड. अजित बलदोटा उपस्थित होते.