लोणावळा : ‘अरे, तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आले होते? त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म व चिन्हासाठी नेत्यांची सही लागते, ती माझी आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुला निवडून आणण्यासाठी राबले, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज तू दमदाटी करतोस? सभेला जाऊ नका म्हणून सांगतोस? एकदा दम दिलास, आता बस्स...! पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्याने जात नाही. मात्र, कोणी त्या मार्गाने जाण्याची परिस्थिती निर्माण केली तर सोडत नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सुनावले.
आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला.
पवारांनी धमकी देणे अयोग्य : फडणवीसमावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना कथित दमदाटी केली म्हणून शरद पवार यांनी एकदा दमदाटी केली हे ठीक आहे; पण पुन्हा दमदाटी केलीस तर याद राख, शरद पवार म्हणतात मला, असे पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने म्हणणे योग्य वाटत नाही. त्यांच्यासारख्या नेत्याने धमकी देणे अयोग्य वाटते. पवार आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा स्तर खाली येईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.