पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या विविध देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जानेवारीमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचा नवा विक्रम केला आहे; परंतु प्रशासनाकडून पाणीकपातीसाठी ही नवी खेळी सुरू असून, सत्ताधाऱ्यांनी याबाबत तोंडावर बोट ठेवले आहे.शहरामध्ये गेल्या काही आठवड्यांत दर गुरुवारीपाणीपुरवठा बंद करण्यात येत असून, ही पुणेकरांवर लादलेली अघोषित पाणीकपात आहे का, असा प्रश्न आयुक्त सौरभ राव यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या वेळी पुणे शहरामध्य दर गुरुवारी विद्युत विषयक आवश्यक कामे करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात शहरामध्ये कोठे दुरुस्ती करण्यात आली. जलवाहिन्यांची दुरुस्ती कोणत्या ठिकाणी झाली याबाबत ही ठोस उत्तर देण्यात आले नाही. पुढील काही महिने पाणीगळती रोखण्यासाठी लहान-मोठी दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यामुळे मात्र पुणेकरांना दर आठवड्याला दोन दिवस पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. पत्रकार परिषदेसाठी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे उपस्थित होते.जलसंपदा आणि महापालिका यांच्यामध्ये पाण्यावरून सध्या वाद सुरू आहेत. फेबु्रवारी महिन्यामध्ये धरणातील जलसाठ्याचा विचार करून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. जलसंपदा विभाग महापालिकेला केवळ दररोज ११५० एमएलडी पाणी देण्यास तयार आहे. महापालिकेला शहराची गरज लक्षात घेता १३५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. या वादामुळे जलसंपदा विभागाकडून शहराचे तीनवेळा पाणी बंद करण्यात आले होते. पाणीकपातीवर उपाय म्हणून दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणी बंद ठेवण्याची नामी शक्कल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शोधून काढली आहे. गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर, महिन्याला सुमारे ५ हजार ४०० एमएलडी पाण्याची बचत होईल. त्यामुळे दररोज २०० एमएलडी पाणी कमी करण्याचे धोरणसुद्धा राबवता येईल. यासाठी हीपाणीकपात केली जात आहे.>ही पाणीकपात नाहीमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुणे शहराला दररोज १३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मिळणाºया पाण्याचे योग्य नियोजन प्रशासन करत आहे. शहरात होणारी पाणीगळती रोखण्यासाठी दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे गुरुवारीपाणीपुरवठा बंद ठेवणे म्हणजेपाणीकपात होत नाही. पाणीपुरवठा बंद ठेवला, तरी महापालिकेला ११०० ते ११५० एमएलडी पाणी धरणातून उचलावेच लागते. त्यामुळे ही पाणी कपात नाही. - मुक्ता टिळक, महापौर>जलकेंद्रालास्वतंत्र विद्युतपुरवठामहावितरणकडून पर्वती जलकेंद्राचा विद्युत पुरवठा गुरुवारी (दि.२४) रोजी बंद करण्यात आलेला नाही. गुरुवारी लघुवाहिन्यांची दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. जलकेंद्राला स्वतंत्र वीजपुरवठा असल्यामुळे वीज खंडित होत नाही.-निशीकांत राऊत,महावितरण, जनसंपर्क अधिकारी
आता दर गुरुवारी पाणीकपात, देखभाल-दुरुस्तीचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 1:11 AM