- श्रीकिशन काळे
पुणे : शेतात कीटकनाशके फवारणी करण्यासाठी आता ड्रोनचा वापर करता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेऊन ड्रोन चालविण्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेला कोणीही याचे ट्रेनिंग घेऊ शकणार आहे. त्यानंतर ड्रोन पायलट म्हणून काम करून स्वयंरोजगार मिळवू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी सबसिडीचा पर्याय आहे.
शेतकऱ्यांना ‘आरपीसी’ (रिमोट पायलट सर्टिफिकेट) प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिकपणे ड्रोन चालविता येणार आहे. त्यासाठी राज्यात प्रशिक्षण केंद्रांची नियुक्ती केली आहे. त्यांना डायरेक्टर जनरल सिव्हिल ॲव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडून नियमावली दिली आहे. सध्या कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. हेच काम ड्रोनद्वारे केल्यास कमी वेळेत होऊ शकणार आहे. त्यासाठी २५ किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध आहेत. त्यात १० लिटर कीटकनाशके ठेवता येतात. सध्या ड्रोनच्या किमती खूप आहेत. त्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत आहेत तसेच शेतकऱ्यांनी त्याचा वापर कसा करायचा? त्याची नियमावलीदेखील ठरवली जात आहे. शेतकऱ्यांना ५ लाखांची ड्रोन खरेदी करायची असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी दिली आहे. जेणेकरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा, या मागील उद्देश आहे.
ड्रोनचा कशासाठी वापर?
कृषी क्षेत्रासाठी, पर्यावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी, शेतात कीड लागली का?, एरिया मॅपिंग, पीक मॉनिटरिंग आदी कामांसाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो. सध्या किसान धोरणांतही ड्रोनचा समावेश आहे. सरकारकडून ‘डिजिटल स्काय डॉट डीजीसीए’ या संकेतस्थळावर ड्रोन उपलब्ध केले आहेत.
या संस्थांना परवानगी
अकॅडमी ऑफ करिअर ॲव्हिएशन (पुणे), पीबीसीज एरो हब (पुणे), रेडवर्ड फ्लाइट ट्रेनिंग ॲकॅडमी (बारामती), आदिसा ड्रोना (कोल्हापूर), ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), बॉम्बे फ्लाइंग क्लब (मुंबई) आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (उस्मानाबाद) या संस्थांना राज्यात परवानगी दिली आहे.
केंद्राच्या सूचनांनुसार आम्ही पाच दिवसांचा कोर्स घेत आहोत. ज्यात ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र असेल. त्यासाठी दहावी पास, फिटनेस प्रमाणपत्र, आधारकार्ड व पासपोर्ट असणे बंधनकारक आहे. त्यानंतर शेतीसाठी ड्रोनचा वापर करता येईल. विविध कृषी संस्था, शास्त्रज्ञ, शेतकरी आमच्याकडून ट्रेनिंग घेत आहेत.
- प्रणव चित्ते, संचालक, पीबीसीज एरो हब, पुणे