हडपसर : ससाणेनगर, हांडेवाडी, सय्यदनगर आणि काळेपडळ या रस्त्यांवरील वाहतुकीचा तिढा कायम आहे. ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंंगवरील भुयारी मार्गाचा प्रश्न कित्येक महिन्यांपासून रखडला आहे. येथे उड्डाणपूल की भुयारी मार्ग, असा राजकीय वाद कायम राहिला आहे. आता केंद्र, राज्य आणि पालिकेतही भाजपाची सत्ता असल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातील हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासन स्तरावर पुढाकाराची गरज आहे. आता तरी हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे नागरिकांना वाटते.रेल्वेमार्गावरील फाटक बंद राहत असल्यामुळे हडपसर उपनगरातील बारा वाड्या, हांडेवाडी रस्ता, ससाणेनगर रस्त्यावर वाहतूककोंडी होते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे ऐकेरी वाहतुकीचा पर्याय अवलंबला आहे; मात्र तोही आता उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे पालिकेने आता प्राधान्याने ससाणेनगर-सय्यदनगर येथील रेल्वे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.काळेपडळ, महमंदवाडी भागातील वाढत्या नागरीकरणामुळे या परिसरातील नागरिकांना दैनंदिन व्यवहार व कामानिमित्त नेहमीच या ठिकाणाहून ये-जा करावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शिवसेना व भाजपा यांच्या राजकीय कुरघोडीत ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंंगवर रेल्वे उड्डाणपूल की भुयारी मार्ग करायचा, असा प्रश्न कायमच चर्चेत राहिला आहे. पालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादीने भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले. तर, त्याच वेळी भाजपा व शिवसेनेने येथे उड्डाणपुलाचा आग्रह धरला. मात्र, यांपैकी कोणत्याही कामाला अद्याप गती न मिळाल्याने या भागातील नागरिकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)प्रश्न मार्गी लावासत्तांतर झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून आता भुयारी मार्ग काय किंंवा उड्डाणपूल आम्हाला वाहतूककोंडीतून मुक्त करा, अशी भावना या नव्या कारभाऱ्यांकडून नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रशासन स्तरावरच या समस्येला सजगता दाखवून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
आता तरी कोंडीतून सोडवा हो
By admin | Published: March 30, 2017 2:43 AM