पुणे : अापल्याकडील अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळांपासून वंचित राहत अाहेत. ज्या गतीने अापल्याकडील मैदाने कमी हाेत अाहेत, त्याचा विचार करता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल अशी खंत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल तसेच स्वतःच्या अाराेग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्यात सचिन यांच्या मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डाॅ. एन. एस उमराणी, प्र-कुलसचिव डाॅ. अरविंद शाळीग्राम, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डाॅ. दीपक माने तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक उपस्थित हाेते. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. सचिन तेंडुलकर यांनी अापल्या मुलाखतीतून अनेक पैलूंना हात घातला. अापल्या अायुष्यातील खेळाचे महत्त्व त्यांनी अाधाेरेखित केले. खेळामुळे अायुष्यात अनेक बदल झाले असेही त्यांनी अावर्जून नमूद केले. शाळेच्या मैदानांबाबत विचारले असता ते म्हणाले, अनेक शाळांना मैदान नसते, त्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध करुन द्यायला हवे. खेळाचे महत्त्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. त्याचबराेबर शिक्षणामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा. असा विषय अभ्यासक्रमात ठेवल्यास अनेक चांगले बदल विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतील. मुलांमधील निराशेबाबत बाेलताना तेंडुलकर म्हणाले, तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीयांनी अापले विचार बदलले तरच अापल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे, मित्रांसाेबत वेळ घालवणे, दंगा करणे तितकेच अावश्यक अाहे. अापली शक्ती याेग्य गाेष्टींमध्ये अापण गुंतवायला हवी. मला माझ्या घरच्यांनी खेळासाठी नेहमीच सपाेर्ट केला. तंदुरस्त राहण्यासाठी खेळ हे अावश्यक अाहेत. केवळ तरुणांनीच नाही तर सर्वांनीच खेळ खेळायला हवेत. त्याचबराेबर नवनवीन खेळही अापण शाेधून काढले पाहिजे. खेळातूनच सर्वांच एकिकरण हाेत असतं. सध्या विविध साेशल माध्यम अाली अाहेत. ती जेव्हा नव्हती तेव्हा अापलं अायुष्य तणावमुक्त हाेतं. मेहनतीबाबत बाेलताना सचिन म्हणाले, केव्हाही अायुष्यात शाॅर्टकट घेऊ नका. त्यांनी यावेळी त्यांच्या शाळेतील पहिल्या मॅचचे उदाहरणही सांगितले. पेपरमध्ये नाव येण्यासाठी त्यावेळी 30 रण काढावे लागत असत. सचिन यांनी 24 काढले हाेते. स्काेअर लिहिणाऱ्याने त्यांचे रण 30 लिहिले. त्यावेळी त्यांच्या सरांनी त्यांनी किती रण काढले असे विचारले असता त्यांनी प्रामाणिकपणे 24 काढल्याचे सांगितले. परंतु पेपरात नाव येण्यासाठी स्काेअर लिहिणाऱ्याने तीस लिहिले अाणि सचिन यांनी त्याला विराेध न केल्याने त्यांचे प्रशिक्षक त्यांना म्हणाले की, पेपरात नाव यायचे असेल तर स्वतःच्या जीवावर रण काढले पाहिजेत. त्यामुळे यशासाठी कुठलाही शार्टकट न पत्करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच अापण ज्यावेळी अापल्या समस्येवर लक्ष न देता तिच्या उपायावर लक्ष केंद्रीत करु त्यावेळी अापल्याला मार्ग नक्की सापडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अापल्या अायुष्यातील क्रिकेटचे महत्त्व सांगताना क्रिकेट म्हणजे माझ्या अायुष्यात अाॅक्सिजन अाहे असेही त्यांनी अावर्जुन नमूद केले.
अाता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल : सचिन तेंडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 5:16 PM