श्रीकिशन काळे
पुणे: “कोणतीही कला शिकायची असेल, तर त्याची आवड असायला हवी. केवळ उत्सुकता असून चालत नाही. आता तर तबलावादनात बऱ्याचशा महिला येत आहेत. मुलेदेखील करिअर म्हणून तबल्याकडे वळत आहेत. तबलावादनाची सुरुवात करायची असेल, तर तुम्हाला चांगला गुरू मिळायला हवा. माझे गुरू माझे वडीलच होते. आजोबादेखील तबलावादन करायचे. त्यामुळे मी लहानपणापासूनच तबलावादनात करिअर करायचे ठरवले होते,” अशा भावना तबलावादक सावनी तळवलकर यांनी व्यक्त केल्या.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये सावनी तळवलकर यांनी तबलावादन केले. त्यांनाही संधी दुसऱ्यांदा मिळाली. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या त्या कन्या असून, घराण्याचा वारसा त्या पुढे चालवत आहेत. वादनकलेसाठी सावनी तळवलकर यांना संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०१२’ मिळालेला आहे.
सावनी तळवलकर म्हणाल्या, “मला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तबला वाजविण्याची संधी मिळाली. तालाचे उपजत ज्ञान मला मिळाले. माझे आजोबा दत्तात्रय तळवलकर तबलावादक होते, त्यानंतर वडील पं. सुरेश तळवलकर देखील तबलावादक आहेत. घरामध्ये तबलावादनाचे धडे लहानपणापासूनच मिळाले. त्यामुळे मी यात करिअर करायचे ठरवले.”
‘सवाई’तील अनुभव अप्रतिम !
मी ‘सवाई’मध्ये यापूर्वी ज्येष्ठ नृत्यांगणा सुचेता चापेकर यांच्यासोबत तबलावादन केले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.२०) मी पुन्हा ‘सवाई’त तबलावादन केले. हा अनुभव खूप अप्रतिम होता. प्रत्येक कलाकाराला वाटतं की, आपण ‘सवाई’त कला सादर करावी. कारण येथील रसिकांची ऊर्जा आम्हाला खूप आनंद देते.
झाकीर हुसैन अन् आमचे जिव्हाळ्याचे संबंध
उस्ताद झाकीर हुसैन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याशी तळवलकर कुटुंबीयांचं नातं होतं. त्याविषयी सावनी तळवलकर म्हणाल्या, मला उस्ताद झाकीर हुसैन साहेब यांच्यासमोर तबलावादन करता आलं. जणुकाही देवासमोर बसून वाजवत असल्याचा आनंद झाला. त्यांच्याशी आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या तर त्यांच्यासोबतच्या खूप आठवणी आहेत. ते आपल्यामध्ये नाहीत, हेच अजून स्वीकारलं जात नाही. ते खूप मोठे कलाकार होते; पण समोर कितीही लहान कलाकार असला तरी त्याचा ते सन्मान करायचे. सर्वांना मनमुराद दाद द्यायचे. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
परदेशातही तबलावादन !
सावनी तळवलकर यांनी पुण्यासह मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पंढरपूर इत्यादी ठिकाणी आपली कला सादर केली; पण बंगळुरू, दिल्ली आणि त्यानंतर थेट थायलंड, अमेरिकेपर्यंत त्यांच्या तबलावादनाचा ताल रसिकांना ऐकता आला.