आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:57 PM2024-11-15T16:57:47+5:302024-11-15T17:02:05+5:30
Sharad Pawar speak on Maharashtra Women CM: राज्य स्थापनेपासून आजतागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही
पुणे : राज्यात दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार राजकीय चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याबाबत सातत्याने चर्चा होत असते. राज्य स्थापनेपासून आजतागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, हा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो.
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, “राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांची नक्कल करत शरद पवारांचा टोला
शरद पवारांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील शैलीत नक्कल केली. “काही लोक बाहेरून येऊन सांगतात, ‘घोडगंगा साखर कारखाना सुरू कसा होतो ते मी पाहतो.’ तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका नेत्याने अमोल कोल्हे निवडून येतो की नाही ते पाहतो, असे म्हटले होते. पण, लोकांनी आपली जबाबदारी ओळखत कोल्हे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिले,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.
घोडगंगा साखर कारखान्यावरून राज्य सरकारवर टीका
सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी व्हायला हवा, असे सांगत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “घोडगंगा साखर कारखान्याला मंजूर असलेल्या कर्जाचे पैसे दिले जात नाहीत. बँकांनी कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखवली असूनही, राज्य सरकारने अडथळे निर्माण केले आहेत. सहा इतर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले, पण घोडगंगाला रोखण्यात आले. यामागे कोणाचा दबाव आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला, तरीही परिस्थिती बदलली नाही, असेही पवार यांनी नमूद केले. “राज्याच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या अशा गोष्टींवर जनता नक्कीच विचार करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.