पुणे : एका मुलाखतीमध्ये मला त्यांनी २०२४ ला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असे विचारले होते. त्यावर मी म्हणालो २०२४ कशाला? आत्ता जर माझ्याकडे बहुमत असेल तर मला आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तुला काही त्रास आहे का? अशा मिश्किल शब्दात त्यांनी सवाल केला. बारामती येथे नेहमीप्रमाणे आढावा बैठकांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी (दि. २३) आले होते. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, अरे बाबांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे. अवकाळी, गारपीट, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारी खरेदी केंद्र बंद झाले आहेत. ते विचारायचे दिले सोडून आणि हे असे म्हणाले ते तसे म्हणाले. सत्ताधाºयांनी त्यांच्या पक्षांतर्गत काय चर्चा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे मंत्री, पालकमंत्री काय बोलतात हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर याबाबत विचारणा केली तर ते ठीक आहे. असे महाराष्ट्रात अनेक जण काही वक्तव्य करणार आणि तुम्ही मला त्याबाबत विचारणार तुमचं मत काय. मला त्याबाबत काय घेणं देणं आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मला कोणी चांगले म्हणत असतील तुमच्या पोटात का दुखतं...
मुंबई येथील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. नागपूर येथून येताना आमची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मी स्वत: लक्ष घालतो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरच्या सभेला परवानगी देताना सुद्धा त्यांनी नाटके केली होती. इतकेच लोक हवेत तितकेच लोक हवेत असे आडवेढे घेतले होते. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या चौकटीत आपली मतमतांतरे प्रत्येकाने व्यक्त करावीत. मला जर कोणी चांगले म्हणत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? असा सवाल करत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने चांगले काम करावे. कोणी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे.