पिंपरी : सोशल मीडियावर नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’चा सर्रास वापर केला जातो. मात्र, आता शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली.
हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते. नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’ असा शब्दप्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात. दरवर्षी अशा आशयाच्या शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांचा अपमान केला जात असल्याचे देहू संस्थानच्या विश्वस्त निरीक्षणास आले. यामुळे देहू संस्थानने आता कडक पावले उचलली असून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नववर्षासाठी शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्दप्रयोग केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संतांच्या अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा त्यांच्या अभंगाचा किंवा त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नये. अन्यथा देहू संस्थानामार्फत कडक कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. संतांच्याच नावांचे नाही तर देशातील कुठल्याही महापुरुषांच्या नावाचं केलेलं विडबंन खपवून घेतले जाणार नाही.
- नितीन महाराज मोरे, अध्यक्ष, देहू संस्थान