सलीम शेख
शिवणे : पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या पैगंबर शेख या तरुणाने कुर्बानीची एक नवीन व्याख्या केली आहे. आपण जी कुर्बानी देतो, ती देवापर्यंत पोहोचते किंवा नाही हे आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. परंतु, त्याच कुर्बानीचा पैसा गोरगरीब लोकांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरला तर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद नक्कीच आपल्याला देव पावल्याचे सुख मिळवून देऊ शकते.
ईद-उल-अझा म्हणजेच, बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती बकरा घेण्याची असते, असे लोक बकऱ्याची कुर्बानी देतात. प्रेषित पैगंबरांपासून ही प्रथा चालत आलेली आहे. कुर्बानी केल्यानंतर त्याचे तीन समान भाग करून एक भाग स्वतः ठेवावा, दुसरा नातेवाईक आणि तिसरा भाग परिसरातील गोरगरिबांना वाटप करावयाचा असतो. मुस्लिम समाजात कुर्बानीचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
पैगंबर शेख यांनी ९ वर्षांपूर्वी सोशल मीडिया फाउंडेशन आणि मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या माध्यमातून कुर्बानी केरळ पूरग्रस्तांसाठी राबवली होती आणि त्यामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. मदत करणाऱ्यांमध्ये सर्वधर्मीय आहेत. ते या सत्कार्यामध्ये वाटा उचलतात. मुस्लिम समाजाकडून कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यातूनच खेड्यापाड्यातील मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत म्हणून पुस्तके वाटप अथवा अन्य शालेय वस्तूंचे वाटप करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले गेले. सोशल मीडिया फाउंडेशनच्या वतीने जमा झालेल्या निधीतून आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत करण्यात आलेली आहे. हा उपक्रम ११ जुलैपर्यंत चालू ठेवणार असून, त्यामधून जमा झालेला निधी हा गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच्या स्वरुपात वाटला जाईल असे पैगंबर शेख यांनी सांगितले.
''काहीजण याला मागील वर्षी विरोध करत होते, तेच यावर्षी यात सामील झाले आहेत. बऱ्याच जणांचे फोन येतात आणि म्हणतात, आम्हाला खरंतर आता खरी कुर्बानी दिल्यासारखे वाटत आहे. काहीजण प्रतिक्रिया पोष्ट करू नका, असेही म्हणतात. कारण त्यांना विरोधाला तोंड देण्याची इच्छा नसते. पण निदान बदलाच्या दिशेने या लोकांनी पाऊल उचलले हे जास्त महत्त्वाचे आहे. आर्थिक कुर्बानी हा वैचारिक वाद आहे. जे विचार लोकांना पटतील ते लोक घेतील. नाहीतर सोडून देतील.- पैगंबर शेख, (मुस्लिम समाज सुधारणा चळवळ) ''