पुणे : राज्यात मॉन्सून पुन्हा जोरकसपणे सक्रिय होण्याचा अंदाज असून, सोमवारपासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत कोकण, गोव्यात तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
मध्य भारतात तयार झालेल्या पश्चिमी चक्रावातामुळे तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या दक्षिण पश्चिमी वाऱ्यांमुळे विदर्भात रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवसांमध्ये या भागात अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर वाहत असलेले पश्चिमी वारे तसेच उत्तर कर्नाटक व तमिळनाडूमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या चार दिवसांत सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत राज्यातील कोकण, मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यात मडगाव ६३, मुरगाव ३४, वैभववाडी २६, माणगाव १७, पेण १४, अलिबाग १३, तर विदर्भातील देसाईगंज ४६, ब्रह्मपुरी ३३, वरोरा २१, अर्जुनी मोरगाव २०, कोरची १९ तसेच मराठवाड्यातील निलंगा ४२, मुखेड ४१, अहमदपूर २३, चाकूर १९, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील चाळीसगाव १०, सटाणा, बागलाण, चोपडा प्रत्येकी ९, अमळनेर ६, बोदवड ५ व जळगाव, पारोळा येथे प्रत्येकी ४ मि.मी. पाऊस झाला.
पुण्यात सोमवारनंतर मध्यम पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून, त्यानंतरच्या तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.