लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयुष्यभर पैशाची पर्वा न करता रंगभूमीची सेवा केली. आता आयुष्याच्या उतरत्या काळात तरी चार पैसे हाताशी असावेत अशी माफक अपेक्षा करणे चुकीचे आहे का? मात्र हे हक्काचे मानधन देखील वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे... आधीच तुटपुंजे मानधन... त्यात तेही दर महिना हातात मिळत नाही. सांगा आम्ही जगायचं कसं?... ही व्यथा आहे ज्येष्ठ कलावंतांची. आता मंत्र्यांनीच आम्हाला दत्तक घ्यावे, अशी आर्त विनवणी एका ज्येष्ठ कलावंताने केली आहे.
राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ कलावंतांना दर महिना मानधन दिले जाते. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून हे मानधन कलावंतांना मिळालेले नाही. या कलावंतांनी आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली. कोणतीही अपेक्षा न ठेवता रसिकांचे मनोरंजन केले. परंतु वयाच्या उतरत्या काळात गाठीशी पैसा नसल्याने या कलावंतांना शासनाच्या मानधनावर जगण्याची वेळ आली आहे. दर महिना शासनाकडून मानधन मिळणे अपेक्षित असतानाही ते तीन ते चार महिन्यामधून एकदाच एकत्रितपणे मिळत आहे. ते पण मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे कलावंतांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. औषधाला देखील कलावंतांकडे पैसे नाहीत. यापरिस्थितीमध्ये कसं जगायचं असा सवाल कलावंतांनी उपस्थित केला आहे. यातच दोन वर्षांपासून वुद्ध कलावंतांची मानधन समितीच अस्तित्वात नाही. राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ५० वर्षांवरील ज्येष्ठ कलावंतांना अ,ब,क श्रेणीनुसार मानधन दिले जाते. या ज्येष्ठ कलावंतांची निवड करण्याची जबाबदारी या समितीची आहे. ही समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची असते. मात्र ती समिती स्थापन करण्यासाठी अद्यापही पालकमंत्र्यांना मुहूर्त मिळालेला नाही.
---
आम्हाला चार महिने झाले मानधन मिळालेले नाही. आम्ही कसे दिवस काढत आहोत हे आमचे आम्हालाच माहिती आहे. जशी गाव दत्तक घेतली जातात तशीच आमदार, खासदार अथवा मंत्र्यांनीच आम्हाला दत्तक घ्यावे. कारण शासनाला विचारले तर आमच्याकडे फंड नाही असे सांगितले जाते. मग त्यावर दत्तक घेणं हाच एक मार्ग आहे.
- रजनी भट, ज्येष्ठ अभिनेत्री
----
कलावंतांना दर महिना मानधन मिळणे अपेक्षित असताना मानधनाची रक्कम दोन ते तीन महिन्यातून एकत्रितपणे दिली जाते. किमान महिन्याच्या महिन्याला मानधन मिळाले तर हाताशी औषधपाण्यासाठी काहीतरी रक्कम राहू शकते. मात्र तसे होत नाही. आता तर काय चार महिने झाले मानधनही मिळालेले नाही.
- स्वरूपकुमार, ज्येष्ठ अभिनेते
--
मला अ श्रेणीनुसार ३१५० रूपये मानधन आहे. दर महिना पैसे मिळाले तर किमान औषधपाण्याचा आमचा खर्च तरी सुटतो. पण तेही आम्हाला वेळेवर हातात मिळत नाही. त्यासाठी कुणाच्या तरी दाराशी जाऊन आम्हाला ओरड करावी लागते. त्यानंतर काहीतरी हालचाली होतात. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’. आमच्यासारख्या कलावंतांचा शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.
- सुहासिनी देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री
---
ज्येष्ठ कलावंतांसाठी राज्य शासनाकडून ही योजना १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ केली असून, कलावंतांचे रखडलेले नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे मानधन देण्याचे काम सुरू झाले आहे.
- विभीषण चावरे, संचालक राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय
---
चौकट
राज्यातील २८ हजार ज्येष्ठ कलावंतांना मानधन दिले जाते. अ श्रेणीनुसार ३१५० रुपये , ब श्रेणी नुसार २७००, क श्रेणी नुसार २२५० रूपयांचे मानधन कलावंतांना मिळते.