पुणे : तुम्ही जर पीएमपीने प्रवास करीत असाल अाणि कंटक्टरचं तुमच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा गर्दीचा फायदा घेऊन तुम्ही फुकट प्रवास करत असाल, तर सावधान. पीएमपी प्रशासनाने तिकिट तपासणी अधिक कडक केली असून जुलै महिन्यात 1 हजार 86 फुकट्या प्रवाशांकडून 5 लाख 60 हजार 300 इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. त्यामुळे तुम्ही जर फुकटचा प्रवास केलात तर तुम्हाला कारवाईला सामाेरे जावे लागणार अाहे.
पीएमपी मधून राेज दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळच्या तसेच संध्याकाळच्या सुमारास बसेसला माेठी गर्दी हाेत असते. याच गर्दीचा फायदा घेत अनेकजण फुकट प्रवास करत असतात. प्रवासी संख्या माेठी असतानाही पीएमपी सातत्याने ताेट्यात अाहे. त्यामुळे अाता फुकट्या प्रवाशांवर अावर घालण्यासाठी पीएमपीने कंबर कसली अाहे. पीएमपीकडून तिकीट तपासणी माेहिम तीव्र केली असून 11 तिकीट तपासणीसांकडून विविध मार्गांवर कारवाई करण्यात येत अाहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा ही कारवाई करण्यात येत अाहे. या तपासणीसांना राेज किमान दाेन तरी फुकट प्रवाशांना दंड करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्याचबराेबर येत्या काळात तिकीट तपासणीसांची संख्या वाढविण्याचा पीएमपीचा प्रयत्न असणार अाहे. जुलै महिन्यात 1 हजार 86 फुकट्यांवर कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून 5 लाख 60 हजार 300 इतका दंड वसून करण्यात अाला अाहे. तर जून मध्ये 5 लाख 12 हजार 350 इतका दंड वसूल करण्यात अाला हाेता. या अाकडेवारीनुसार दरराेज 60 ते 62 फुकटे प्रवाशांवर कारवाई करण्यात येत अाहे. अाधी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना 100 इतका दंड करण्यात येत हाेता. परंतु तुकाराम मुंडेंच्या काळात त्यांनी हा दंड 100 वरुन 300 इतका वाढवला. तसेच पासचा गैरवापर करणाऱ्यांना 500 रुपये दंड ठाेठावण्यात सध्या येत अाहे.
फुकट्यांवर कारवाई केली जात असतानाच वाहकांकडील राेकड तपासणी सुद्धा अधिक कडक करण्यात अाली अाहे. फाडली गेलेली तिकीटे अाणि जमा झालेली रक्कम याेग्य अाहे का हे तपासण्याचे सुद्धा अादेश देण्यात अाले अाहेत. सध्या तपासणीस हे विविध मार्गांवर जात तिकीट तपासणी करीत अाहेत. पीएमपीच्या मार्गांची संख्या तसेच प्रवाशीसंख्या पाहता येत्या काळात तापसणीसांचे प्रमाण वाढवावे लागणार अाहे. विनातिकीट प्रवास न करण्याचे पीएमपीकडून अावाहन करण्यात अाले अाहे.