बारामती : लाल दिवा मिळाला की शेतकरी नेते आता सरकारची भाषा बोलायला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या भाषेचा त्यांना विसर पडला आहे. दुधामध्ये कोणी भेसळ करू नका. कोणी चूक केली आणि आता पदरात घ्या म्हणून माझ्याकडे आला तर ते शक्य नाही, आता पदर फाटला आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला.पवार म्हणाले, की दूध पॅकिंगची प्लॅस्टिक पिशवी दुकानदाराने माघारी न घेतल्यास प्लॅस्टिक पिशवी बंद करणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले होते. त्याला पर्याय म्हणून काचेच्या बाटल्यांमध्ये दूध पॅकिंग करावे लागेल. आपले दूध उच्च दर्जाचे असेल तर त्याचे पॅकिंगदेखील उच्च दर्जाचे असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या दुधात भेसळ करता येणार नाही. शेतकºयांना दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले होते. हे अनुदान ८ ते १५ दिवसांत जमा होण्याची गरज आहे. मात्र अनुदान जमा होण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार असेल, तर त्याचा दूध उत्पादकाला फायदा होणार नाही.दूध व्यवसाय आता मुख्य व्यवसाय झाला आहे. तो आता व्यापारी दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे. दुष्काळामुळे उच्च जातीच्या गायी विक्रीसाठी बाजारात येतील. या गायी जपाव्यात, अशी सूचनादेखील पवार यांनी मांडली.
आता पदर फाटला आहे : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 2:10 AM