बारामती : नगरपालिकांची स्थापना झाली तेव्हा कारभार पाहणाऱ्या मंडळींच्या डोक्यांवर फेटे होते. त्यानंतर टोपीवाल्यांचे राज्य आले. काळानुसार पेहराव बदलत असतो. फेटेवाले, टोपीवाले गेले, आता बोडक्यांच्या हातात सत्ता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ते नवीन प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.ते म्हणाले, बारामतीच्या जडणघडणीत त्या त्या वेळच्या मंडळींचे योगदान मोलाचे ठरले आहे. त्यामुळेच आपण नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष दिले नाही. कारण निवडणुका झाल्या, की त्या काळची मंडळी पुढील पाच वर्षे मतभेद न करता काम करीत, त्यामुळेच शहराचा विकास नियोजनबद्ध झाला आहे.बारामती पालिकेच्या निवडणुकीत कधी लक्ष घातले नाही. कारण या निवडणुकीत गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता, उमेदवार सढळ हाताने त्यांना अर्थपुरवठा करतात. उमेदवारांकडून घेणारेदेखील हात आखडता घेत नाहीत. त्यामुळे ‘जो येईल तो आपला’ या न्यायाने नगरपालिकेच्या निवडणुकांकडे पाहिले. आता प्रभाग पद्धतीमुळे चार उमेदवारांचे कमी अर्थकारण होत असेल, परंतु नगरपालिकेकडे अजून १२९ कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय भाव निघेल, हे आता बारामतीकरच ठरवतील, अशी टिप्पणी त्यांनी केली. या वेळी अजित पवार म्हणाले, बारामतीच्या विकासाचे कौतुक केंद्र व राज्यातील मंत्री करतात. तरीदेखील काही त्रुटी दाखवून टीका केली जाते. मात्र आम्ही काम करीत राहणार, बारामतीच्या हद्दवाढीसह जुन्या-नव्या बारामतीसाठी १३० कोटी रुपयांचा बृहत् पाणीपुरवठा योजनेसह अन्य पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला. उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
आता ‘बोडक्यां’च्या हातात सत्ता
By admin | Published: November 14, 2015 2:55 AM