लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे:प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रीपेड रिक्षाची सेवा सुरू होणार आहे. गुरुवारी दुपारी शहर वाहतूक पोलीस व लोहमार्ग पोलीस यांची स्थानक परिसरात संयुक्त पाहणी झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. लवकरच ही सेवा सुरू होईल.
गेल्या काही दिवसांत पुणे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपी हे रिक्षाचालक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आता बेकायदेशीर रिक्षाचालकावर कारवाई करीत आहेत. दोन दिवसांत पोलिसांनी काही रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. पुणे स्थानकावर काही वर्षा पूर्वी प्रीपेड रिक्षेची सेवा होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून ती बंद करण्यात आली. आता या निमित्ताने ती पुन्हा एकदा सुरु होत आहे.
बॉक्स १
रिक्षाचालकांसाठी नियमावली :
प्रीपेड रिक्षा सुरू होताना रिक्षाचालकांना नियमावली असणार आहे. सर्व रिक्षांना कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करणे तसेच ते गणवेशात असणे, बॅच अनिवार्य केले आहे. येत्या आठवड्या भरात ही सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे.
बॉक्स २
रात्री पथक कार्यरत :
रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनी रिक्षांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहे. यासाठी वाहतूक पोलीस व लोहमार्ग पोलीस कारवाई करीत असताना आता आरटीओ ने देखील कारवाईस सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी स्थानक आवरात पोलिसांची कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत ४० रिक्षाचालकांवर केली आहे.
कोट १
रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही आमचे पथक तयार केले आहे. तसेच स्थानकावरची गस्त देखील वाढविली आहे. महिला पोलिसांची देखील यासाठी नेमणूक केली आहे.
मौला सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, पुणे.
कोट २
गुरुवारी आम्ही पुणे स्थानक परिसराची पाहणी केली. येत्या आठवड्याभरात आम्ही पुणे स्थानकावरून प्रीपेड रिक्षा सुरू करीत आहोत. प्रवासी सुरक्षा अधिक चांगली व्हावी, या करीत आम्ही प्रयत्नशील आहोत.
राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त ( वाहतूक), पुणे.