पुणे : नाे पार्किंगचा बाेर्ड पाहून सुद्धा बिंधास त्या खाली गाडी लावणाऱ्यांना अाता त्यांचा हा प्रताप चांगलाच महागात पडणार अाहे. कारण अाता पुणे शहर वाहतूक पाेलिसांकडून नाे पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना माेटार वाहन कायद्याएेवजी पुणे महानगरपालिका (पीएमसी) अॅक्टचा वापर करुन कारवाई करण्यात येत अाहे. पीएमसी अॅक्टनुसार नाे पार्किंगमध्ये दुचाकीसाठी 1 हजार तर चारचाकीसाठी 2 हजार रुपये इतक्या दंडाची तरतुद अाहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नाे पार्किंगमध्ये गाडी लावत असाल तर दाेनदा विचार करा. कारण अाता नाे पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी तुम्हाला हजराे रुपये माेजावे लागतील.
महापालिकेकडून रस्ते, फुटपाथ याची देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यामुळे महापालिकेला दंड लावण्याचा अधिकार अाहे. पीएमसी कायद्यानुसार नाे पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्यांना 1 तर चारचाकी लावणाऱ्यांना 2 हजार रुपये दंड अाकारता येताे. याच कायद्याचा अाधार घेत वाहतूक पाेलिसांकडून शहरातील गर्दीच्या ठिकाणी पीएमसी अॅक्टनुसार कारवाई करण्यात येत अाहे. माेटार वाहन कायद्यानुसार नाे पार्किंग, नाे एंट्री, फुटपाथवर लावण्यात येणारी वाहने यासाठी केवळ 200 रुपये दंड अाकारण्याची तरतूद अाहे.परंतु या कायद्याचा धाक नियम ताेडणाऱ्यांमध्ये राहिला नसल्याचे चित्र अाहे. शहरातील अनेक भागात नाे पार्किंगमध्ये वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक काेंडी हाेत असते. पाेलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी वाहनचालकांवर त्याचा जरब बसत नाही. त्यामुळे वाहतूक पाेलिसांना माेटार कायद्याएेवजी पीएमसी अॅक्टनुसार कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर या प्रकारची कारवाई करण्यात येत अाहे. या कारवाईमुळे नाे पार्किंगमध्ये वाहन लावून वाहतूकीला अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसायला मदत हाेणार अाहे.
याबाबत बाेलताना वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, नियम माेडणाऱ्यांना जरब बसण्यासाठी पाेलिसांना शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर पीएमसी अॅक्टनुसार कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. दंडाची रक्कम वाढल्याने नियम माेडणाऱ्यांना जरब बसण्यास मदत हाेईल. अाधी या कारवाईचा दंड हा राेखीच्या स्वरुपात वसूल केला जात असे. परंतु या दंडाच्या वसुलीमध्ये पारदर्शकता यावी तसेच नागरिकांना साेयीचे व्हावे यासाठी स्वाईप मशीनच्या सहाय्याने देखील हा दंड वसूल करण्यात येत अाहे. सध्या शहरातील 22 वातूक विभागांना स्वाईप मशिन पुरवण्यात अाल्या अाहेत.