पुणे :पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने गती पकडली असतानाच आता या मार्गावर रेल कम रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा झाली.
नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे- नाशिक अति जलद रेल्वेमार्ग या २३५ किमी प्रकल्पाचा लाभ पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला होणार असून, देशातील सर्वांत किफायतशीर अति जलद मार्ग म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. १६ हजार ३९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, यात महाराष्ट्र शासनाचा ३ हजार २७३ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. या खर्चाला राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून, सर्व आवश्यक त्या परवानग्या या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्याची विनंती केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केल्या.
रेल्वेमार्गावर जेथे पूल बांधले जातात, अशा नदी व अन्य ठिकाणी केवळ रेल्वेपूल बांधण्याऐवजी रेल्वेपुलावर वरच्या बाजूला वाहनांसाठी पूल बांधला जातो. अशा प्रकारचे पूल गाजीपूर येथे नदीवर बांधण्यात येत आहेत. ही योजना पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पात राबविण्याविषयी चर्चा झाली.