ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथील करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 09:46 PM2021-06-19T21:46:47+5:302021-06-19T21:58:43+5:30
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके यांनी निर्बंध शिथिल करण्याची आक्रमक मागणी...
पुणे : रुग्ण संख्या कमी झाल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरात त्वरीत निर्बंध शिथिल केले. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात तिस-या स्तरापर्यंत निर्बंध शिथिल करणे आवश्यक होते. पण आठ दिवस झाले तरी ग्रामीण भागातील निर्बंध कायम आहेत. आता किमान या आठवड्यात तरी ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करा,अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि सुनिल शेळके यांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार म्हणाले मी दोन दिवसांची रुग्ण संख्या लक्षात घेऊन निर्णय घेईल व तसे आदेश जिल्हाधिकारी यांना देईल. पण ग्रामीण भागात सध्या तरी कोणतेही बदल होणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने बैठकीत चालू आठवड्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील रुग्ण संख्या, पाॅझिटिव्ह दर आणि त्यानुसार निर्बंधस्तर काय असेल असे स्पष्ट केले. यामध्ये पुणे शहराचा पाॅझिटिव्ह दर पाच टक्क्या पेक्षा कमी म्हणजे ४.८ टक्के निर्बंधस्तर एक, पिंपरी-चिंचवड शहराचा पाॅझिटिव्ह दर ५.१ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन व ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्ह दर ८.५ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन झाला आहे. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून दहा टक्क्यापेक्षा पाॅझिटिव्ह दर कमी झाला असताना आजही चौथ्या स्तराचेच निर्बंध लागू आहेत. मोहिते यांनी सांगितले ग्रामीण भागात दुपारी २ पर्यंत दुकाने सुरू असल्याने प्रचंड गर्दी होते. तर राजगुरुनगर शहरामध्ये तर सकाळी ११ पर्यंत दुकाने सुरू आहेत. आता या आठवड्यात तरी निर्बंध शिथिल करा. पण ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होण्यासाठी आणखी एक आठवडा थांबा असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.