पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. खरंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल असे म्हणत आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दुसरीकडे नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात 'आता भावी मुख्यमंत्री नको पाच आकडी नाव हवे' असं वक्तव्य केल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या वक्तव्याला एकप्रकारे अनुमोदन मिळाल्याचे दिसून आले आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात फडणवीस उपस्थित असताना हा किस्सा घडला आहे. लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना इथेच सर्व्हेक्षण घ्या. आणि ज्यांना ते मुख्यमंत्री हवेत त्यांनी हात वर करा असे एका कार्यक्रमात शैक्षणिक संस्थेच्या कार्याध्यक्षानी सांगितले. त्याच क्षणी अर्ध्या सभागृहाने हात वर केले. हे वक्तव्य एकीकडे करताना कार्याध्यक्षानी आणखी एक गुगली टाकली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे सक्षम नेतृत्व कोण करू शकेल तर ते देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री नको पाच आकडी नाव हवे असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या वक्तव्याला एकप्रकारे अनुमोदन मिळाले. फडणवीस यांनी केवळ स्मित हास्य करून वेळ मारून नेली.