पिंपरी : पाच वर्षांखालील मुला-मुलींचे आधार कार्ड तयार करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली होती. आता ती जबाबदारी पोस्टमनला देण्यात आली आहे. पूर्व पुणे विभागाच्या माध्यमातून दररोज सुमारे ३०० मुलांचे आधार कार्ड काढले जात आहे. यासाठी शहराच्या विविध भागांतील अंगणवाडी सेविका पुढाकार घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांवर होती जबाबदारी
अंगणवाडी सेविका या त्यांच्या भागातील मुलांच्या व पालकांच्या थेट संपर्कात असतात. त्यामुळे यापूर्वी पाच वर्षांपर्यंत असलेल्या लहान मुलांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर होती. मात्र, त्यांच्यावर असलेल्या विविध कामांचा भार वाढत होता.
आता पोस्टमन काढणार आधार कार्ड
यापूर्वी महाईसेवा कार्यालयांसह इतर संस्थांच्या माध्यमातून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड काढले जात होते. आता मुलांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी पोस्टाकडे दिली आहे. त्यानुसार शहरातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विविध ठिकाणी कॅम्प लावले जात आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका मदत करतात.
काय कागदपत्रे लागणार?
जन्माचा दाखला, आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ही कागदपत्रे लागतात. यातील एक जरी कागदपत्र नसेल तर मुलाचे आधार कार्ड काढता येत नाही.
आधार कार्ड काढताना येणाऱ्या अडचणी
पिंपरी चिंचवड परिसरात कामानिमित्त अनेक नागरिक परराज्यातून आले आहेत. त्यांच्या मुलांचा जन्म तेथे झालेला असतो. मात्र, त्यांच्याकडे मुलांच्या जन्माचा मूळ दाखला नसतो. अशा मुलांचे आधार कार्ड काढता येत नाही. तसेच प्रूफ म्हणून देताना आईचे नाव सासरचे असणे गरजेचे असते. तसे नसेल तर वडिलांचे कार्ड द्यावे लागते.
घराजवळच काढा आधार कार्ड
आता विविध कारणांसाठी लहान मुलांचेही आधार कार्ड लागत आहे. त्यामुळे पालकांची ऐनवेळी धावपळ होते. अंगणवाडी सेविका अशा मुलांची यादी तयार करतात. त्याबाबत संबंधित पोस्ट कार्यालयाला माहिती देतात. तसेच पालकांनाही वेळ कळविली जाते. त्यानुसार पोस्ट कार्यालयातील कर्मचारी संबंधित भागात जाऊन मुलांचे आधार कार्ड काढतात. त्यास शहरी भागातून प्रतिसाद मिळत आहे.