पुणे : दिवाळीच्या काळात एसटी महामंडळ दरवर्षी हंगामी दरवाढ करत असते, त्याचप्रमाणे आता दिवाळीत आम्हालाही १० टक्के दरवाढीची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. रिक्षा पंचायत संघटनेने याबाबत थेट मुख्यमंत्री तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे.
परगावी प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी एसटी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत त्यांच्याकडून एसटीचा सर्वाधिक वापर होतो. नेमक्या याच गोष्टीचा लाभ उठवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या काळात महिनाभराची मुदत देऊन हंगामी दरवाढ करण्यात येते. त्याला सरकारचीही मान्यता मिळते. त्यामुळे एसटी महामंडळाला चांगला आर्थिक फायदा मिळतो. प्रवाशांनाही या दरवाढीचे विशेष काही वाटत नाही.
एसटीप्रमाणेच शहरातंर्गत प्रवासासाठी रिक्षा हेच सार्वजनिक वाहन आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांवर दिवाळीच्या विविध कामांसाठी निघालेल्या प्रवाशांना रिक्षाचालक प्रवासी सेवा देत आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहन असूनही रिक्षा चालकांना दिवाळीसाठी म्हणून कसल्याही प्रकारे विशेष उत्पन्न मिळत नाही असे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार यांनी सांगितले.
सरकारी, खाजगी कर्मचारी असलेल्या बहुतांश कामगारांना किमान ८.३३ टक्के म्हणजे एक पगार आणि त्या त्या उद्योगाच्या अवस्था व इच्छेनुसार त्यापेक्षाही अधिक बोनस मिळतो. व्यापारी आस्थापनाही या काळात नेहमीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवतात. सामान्य माणूसही थोडी पदरमोड करून वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करत असतो. मात्र रिक्षा चालकाच्या हातात नियमित भाड्याशिवाय काहीच पडत नाही. त्यामुळे त्यांनाही दिवाळी विशेष बाब म्हणून १८ नोव्हेंबरपर्यंत किमान १० टक्के भाडेवाढ करण्याची परवानगी मिळाली. १९ नोव्हेंबरपासून पुन्हा त्यांचे दर पूर्ववत करावे असे पंचायतीने निवेदनात म्हटले आहे.