पुणे :पुणे व पिंपरी शहरातील कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम आता सप्टेंबरनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. परिणामी या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होईल, हे स्पष्ट झाले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे व पिंपरी शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम भागांचे संपादन सध्या प्रगतिपथावर आहे. पश्चिम भागाचे संपादन जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, पूर्व भागाचे भूसंपादन केवळ ४० टक्के झाले आहे. एकूण प्रकल्पाचा विचार करता भूसंपादन ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच या कामासाठी १७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा १२ मार्च रोजी उघडल्या जाणार आहेत; तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ मार्चनंतर लागू होण्याची शक्यता आहे. पुढील किमान दोन ते अडीच महिने प्रकल्पाच्या भूमिपूजन या संदर्भातील कोणताही निर्णय घेणे शक्य होणार नाही. तसेच निविदा उघडल्यानंतरही कंत्राटदारांना काम देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या दोन महिन्यांच्या काळात निविदांची पडताळणी करून स्वीकृतीचे पत्र कंत्राटदारांना दिले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते, मात्र, या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यामुळे हे भूमिपूजन अद्याप होऊ शकलेले नाही. आचारसंचिता लागण्यास लागण्यापूर्वी अल्पकाळ शिल्लक असल्याने आता भूमिपूजन होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच व लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच हे भूमिपूजन होणार, असे सांगितले जात आहे.
रिंग रोडच्या पश्चिम भागाचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. पूर्व भागाचे ४० भूसंपादन झाले आहे. येत्या १२ मार्च रोजी निविदा उघडून दोन महिन्यांच्या काळात पूर्वतयारी करण्यात येईल. तोपर्यंत पूर्व भागातील भूसंपादन वाढलेले असेल. पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबरमध्येच या कामाला सुरुवात होईल.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे