पुणे - साखर कारखानदारांना इथेनॉलचे प्लँट उभे करण्याविषयी प्रोत्साहन देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी इथेनॉल प्रकल्पाविषयी अनेक अडचणी होत्या. त्या केंद्र सरकारने दूर केल्या असून आता कारखानदारांनी इथेनॉलविषयी पुढाकार घेण्याची वेळ आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. आगामी काळात इथेनॉल, वीज आणि साखर यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले.महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने पार पडलेल्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखानदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याठिकाणी झालेल्या या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, इस्माचे उपाध्यक्ष रोहित पवार उपस्थित होते.पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीकडे पवारांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार दिवसेंदिवस तेलाच्या वाढत जाणाऱ्या किमतीविषयी हैराण आहे. आता कारखानदारांनी इथेनॉल प्रकल्प तातडीने राबविण्याची गरज आहे. ’’हुमनी किडीच्या प्रादुर्भावामुळे उस उत्पादन घटणारउसावर हुमनी या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उसाची दर हेक्टरी उत्पादकता १५ ते २० हजार टनाने कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या भागात त्याचे प्रमाण लक्षणीय असून, कारखानदारांनी हुमनी निर्मूलनाचा उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
इथेनॉलबाबत पुढाकार घेण्याची आता वेळ आली आहे - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 5:26 AM