पुणे : आधी ३७० कलम हटवून काश्मिर भारताचे केले. आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार व नंतर अखंड भारतासाठी प्रयत्न करणार. तेही घेणारच असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांचीच अहिंसा असते, आमच्या नेतृत्वाकडे शक्ती होती, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेला फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपचे महामंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे, पुणे शहरातील पक्षाचे सर्व आमदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपच्या शहर शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केले.
फडणवीस म्हणाले, भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच आहे, मात्र यापुर्वीच्या नेतृत्वात धमक नव्हती. त्यामुळे भारताचा हजारो एकर भूभाग चीनने गिळकृंत केला. आमच्या नेतृत्वात शक्ती आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. डोकलाम केले. आमच्या जवानांना मारता तर आम्हीही तुमच्या जवानांना मारू हे दाखवून दिले. त्यामुळे चीनला अखेर तडजोड करावी लागली. राहूल गांधी यांनाही फडणवीस यांनी लक्ष्य केले. सर्जिकल स्ट्राईकला युवराजांनी पुरावा मागितला त्यावेळी ज्यांच्या घरातील लोक मारले गेले, त्यांना काय वाटले असेल याचा विचार माझ्या मनात येतो असे ते म्हणाले.
''मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा शक्तीशाली, समर्थ भारत घडतो आहे. हा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. ९ ऑगस्टला चले जाव ची घोषणा झाली, त्यावेळी बिहारमध्ये ६ हजार लोक झेंडे घेऊन रस्त्यावर आले. त्यांच्यावर ५०० गोळ्या झाडल्या गेल्या. असा माहितीच नसलेला इतिहास लोकापर्यंत न्यायचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातही अनेक आदिवासी नायक आहे. त्यांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी असे प्रयत्न आहेत. विकास सर्वसमावेशक असावा. यापुर्वी फक्त काही लोकांचाच जीडीपी वाढायचा, आता असे होणार नाही असे फडणवीस म्हणाले.''
''स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टला विभाजन दिन पाळायचा असे आवाहनही फडणवीस यांनी केले. इस्रायलची भूमी २ हजार वर्षे त्यांच्यापासून दूर होती, अखेर त्यांनी ती मिळवलीच. आपल्याही भूमीचा एक तुकडा त्यादिवशी वेगळा झाला. त्याचे शल्य जीवंत ठेवायचे, अखंड भारत केल्यानंतरच ते संपेल असे ते म्हणाले.''