लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माजी महापौरांच्या मुलासह कोरोनाविरोधातील मोहिमेत मृत्युमुखी पडलेल्या ५१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महापालिका कर्मचारी युनियनने दिला. गेले काही महिने या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कोरोना विम्याच्या पैशासह, मयत कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन व अन्य कामांसाठी महापालिकेत फेऱ्या मारत आहेत.
यात दिवंगत माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे नातू गौरव याच्यासह अनेकांचा समावेश आहे. गौरवचे वडील रवींद्र महापालिकेतच आरोग्य विभागात फिल्डवरचे कर्मचारी होते व कोरोना काळात कार्यरत होते. त्यांंना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यातच त्यांचे निधन झाले. महापालिकेचे ४६ चतुर्थ श्रेणी कर्मचारी व ६ अधिकारी असे एकूण ५१ जण कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडले आहेत.
अशा घटनांमध्ये मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाइकाला कोरोना विम्याचे ५० लाख, महापालिकेचे २५ लाख व नोकरी आणि नोकरी नको असेल, तर ५० लाख देण्याची महापालिकेनेच घोषणा केली आहे. पालिकेचीही कसलीही मदत कोणालाही झालेली नाही असे गौरवने सांगितले.
गौरव स्वतः वडीलांच्या जागेवर अनुकंपा ततत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी धडपडत आहे. ती नाही, कसली मदतही नाही, इतकेच काय, पण वडिलांचे निवृत्तिवेतनही सुरू झालेले नाही, हाच अनुभव इतरांचाही असल्याचे गौरवचे म्हणणे आहे.
युनियनचे अध्यक्ष उदय भट म्हणाले की, युनियन म्हणून आम्ही अनेकदा याचा पाठपुरावा केला. त्या नातेवाईकांप्रमाणेच आमच्याही पदरात आश्वासनांशिवाय काहीही पडलेले नाही. त्यांची कोट्यवधीची कामे सुरू आहेत आणि कामगारांचे हक्काचे पैसे द्यायला मात्र हे तयार नाहीत. आता आम्ही हे सहन करणार नाही. या विषयावर आम्ही आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून लवकरच तसे पत्र देण्यात येईल.
चौकट
“फक्त गौरवच नाही तर या सर्वच ५१ प्रकरणांचा आयुक्त व महापौरांनी त्वरित निपटारा करावा. पुणे महापालिकेकडून मृतांच्या नातेवाईकांना अशी वागणूक मिळावी याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.”
-अंकुश काकडे, निमंत्रक, माजी महापौर संघटना.