पुणे : वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी तसेच इतर बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित ५८ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात नुकतीच नवीन अधिसूचना जारी केली आहे. आरटीओला देण्यात येणाऱ्या काही सुविधा या डिजिटल करण्यात आल्यात. मात्र, या ऑनलाइन सुविधांचा उपयोग करण्यासाठी आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी फक्त parivahan.gov.in वर जाऊन आपले ‘आधार कार्ड’ व्हेरिफाय करण्याची गरज आहे.
लर्निंग लायसन्सपासून फिटनेस सर्टिफिकेटपर्यंत
शासनाच्या निर्देशानुसार आधार कार्डला वाहन परवाना, आरसी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर ‘आधार’ पडताळणीद्वारे ऑनलाइन सेवा मिळू शकतील. यामध्ये नागरिकांना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, पत्ता बदलणे, गाडीचे रजिस्ट्रेशन करणे, फिटनेस सर्टिफिकेट यासारख्या अनेक सेवांचा समावेश आहे.
१८ वरून ५८ सेवा ऑनलाइन
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाइन सेवांची संख्या १८ वरून ५८ करण्यात आली आहे. यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, मंत्रालय नागरिक केंद्रित सुविधा आणि सुधारणांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारे संपर्काशिवाय आणि ऑनलाईन सेवांमुळे लोकांचा वेळ खूप वाचेल. यासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील कामाचा ताणही कमी होईल. याशिवाय कामाचा दर्जाही चांगला राहील.
काय आहे फेसलेस सेवा ?
सरकारच्या या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना फेसलेस सेवा मिळण्यासाठी ‘आधार’ आवश्यक आहे. नागरिकांनी फक्त parivahan.gov.in वर जाऊन आपले ‘आधार कार्ड’ व्हेरिफाय करण्याची गरज आहे. त्यानंतर प्रत्येकजण या फेसलेस सुविधांचा लाभ घेऊ शकेल.
पर्मनंट लायसन्ससाठी कार्यालयातच जावे लागणार..
आरटीओच्या ५८ सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र, कायमस्वरुपी वाहन परवाना देण्यापूर्वी संबंधिताला आरटीओ कार्यालयामध्ये येऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावीच लागणार आहे. इतर अनेक सुविधांचा ऑनलाइन लाभ घेता येईल; पण पर्मनंट लायसन्ससाठी कार्यालयातच जावे लागेल.