पुणे : भारतीय रेल्वेच्या संपत्तीचे मुद्रिकरण केले जाणार आहे. हा निर्णय प्रवासी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय रद्द करावा म्हणून ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर तर झोन स्तरावर एनआरएमयू (नॅशनल रेल्वे मजदूर युनियन) च्या वतीने पुणे विभागात चेतावणी दिवसाचे आयोजन केले होते. चेतावणी दिवसाचे औचित्य साधून पुणे स्थानकांवरील विविध डेपो, कार्यालयात जाऊन रेल्वेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विभागीय अध्यक्ष बापू बाराथे व विभागीय सचिव सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी चेतावणी दिवस साजरा झाला.
केंद्र सरकार रेल्वेतील भागीदारी विकून त्याचे खासगीकरण करीत आहे. या निर्णयाचा फटका लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे विभागात व स्थानकावर हा दिवस उत्स्फूर्तपणे पाळला गेला. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संकटात सापडणार आहे. त्यामुळे रेल्वे विकण्यास विरोध करा असे आवाहन करण्यात आले. पुणे स्थानकासह घोरपडी यार्ड तसेच अन्य ठिकणी देखील रेल्वेच्या या निर्णयचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच रेल्वे वाचवा, देश वाचावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सतीश कुमार,अनिता कदम, विशाल कदम, शेखर परमार, एम. एस. तलवार, एम. आय. खान हे पदाधिकारी उपस्थित होते.