NSUI च्या कार्यकर्त्यांचा ‘काँग्रेसभवन’मध्ये दंगा, माजी आमदार, माजी नगरसेवकाला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 12:22 PM2024-02-04T12:22:11+5:302024-02-04T12:22:23+5:30
एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदावरून गेले काही महिने वाद धुमसत असून, शनिवारी तो थेट भांडणाच्या स्वरूपात बाहेर पडला....
पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ काँग्रेस (एनएसयूआय) या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी दुपारी काँग्रेसभवनमध्येच वादविवाद झाले. त्यात माजी आमदार व माजी नगरसेवकाला धक्काबुक्की झाली. एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदावरून गेले काही महिने वाद धुमसत असून, शनिवारी तो थेट भांडणाच्या स्वरूपात बाहेर पडला.
काँग्रेसभवनमध्ये शनिवारी दुपारी हा प्रकार झाला. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख तसेच भूषण रानभरे व अन्य कार्यकर्ते सभासद नोंदणीचे काम करत होते. तिथे अचानक काही कार्यकर्ते आले. त्यांच्यात आणि आधी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बोलाचाली सुरू झाली. शहराध्यक्षपदावरून तसेच सदस्य करण्याचे अधिकार कोणाला, यावरून वाद सुरू झाले. त्यावेळी तिथे काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर उपस्थित होते. भांडणाचा आवाज ऐकताच काँग्रेसभवनच्या अन्य दालनांमधील कार्यकर्तेही तिथे आले. तरीही एकमेकांवर आवाज चढवणे सुरूच होते.
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमधील वाद वाढतच चालले. दोन्ही गटांचे आवाज वाढले. भांडणे होण्याचा प्रसंग उद्भवू नये म्हणून चवधरी व दरेकर मध्ये पडले. मात्र, त्यांच्याकडून एका गटाचे समर्थन केले गेल्याने आधी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबरही वाद सुरू केले. त्यातच दरेकर यांना धक्काबुक्कीही झाली. ‘इंटक’ या काँग्रेसप्रणीत कामगार संघटनेचे बळीराम डोळे हेही तिथे उपस्थित होते. त्यांनीही या भांडणाला आवर घालण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. थोड्या वेळाने हा वाद शांत झाला.
अशी आहे पार्श्वभूमी...
एनएसयूआयची राष्ट्रीय शाखा व काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीने काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदी अभिजित गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख आहेत. त्यांना ही नियुक्ती मान्य नाही. त्यांच्या वतीने भूषण रानभरे हेच शहराध्यक्ष म्हणून काम पाहतात. एका महाविद्यालयामध्ये सदस्य नोंदणी सुरू असताना गोरे यांच्याकडून रानभरे यांच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंध होत असल्यावरून दोन्ही गटांमध्ये मागील काही महिने वाद सुरू आहेत. गोरे यांच्याकडे वरिष्ठांचे पत्र आहे. तर रानभरे यांना त्यांची नियुक्ती रद्द झाल्याचेच मान्य नाही.
म्हणणे ऐकण्याऐवजी वादच सुरू : रानभरे
सदस्य नोंदणीला प्रतिबंध होत होता. म्हणून आम्ही जे प्रतिबंध करत होतो, त्यांना काँग्रेसभवनला बोलावले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा विषय होता. मात्र, त्यांनी काहीही न ऐकता वादच सुरू केले, असे भूषण रानभरे यांनी सांगितले. अभिजित गोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.