--खोर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक दि चेन अंतर्गत सलून व पार्लर व्यवसाय तीस एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे आज दौंड तालुक्यातील नाभिक समाज राज्य शासनाच्या विरोधात उतरला गेला असल्याची माहिती दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंके यांनी दिली आहे.
यासंदर्भात, दौंड तहसीलदार संजय पाटील यांना दौंड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.त्यामध्ये म्हटले आहे की, सलून व पार्लर व्यावसायिक संकटात सापडला असून त्यांना आर्थिक साहाय्य करण्याची मागणी होत आहे. प्रत्येक सलून व्यावसायिकांना मासिक वीस हजार रुपये अनुदान, मुलांची शाळा फी, लाईट बिल, भाडेतत्वावरील घर व दुकानभाडे, शासकीय कर माफ करावेत अशी मागणी केली आहे.
मागील लॉकडाऊनच्या कळात सलून व पार्लर व्यावसायिकांना उपासमार सहन करावी लागली. हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पुन्हा सलून व्यावसायिकांना बंधन घातले आहे. यामुळे सलून व्यावसायिक समाजापुढे आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही. सलून पूर्णपणे हातावर पोट असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे शासनाने आधी कर्नाटक, गुजरात सरकारच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना प्रत्येकी मासिक अनुदान देऊन मगच बंदचा आदेश काढायला हवा होता. एक तर मागण्या पूर्ण करा, अन्यथा सलून दुकाने बंदचा आदेश मागे घ्या. सलून व्यावसायिक धारकांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत दुकाने चालू ठेवण्याचा त्वरित निर्णय घेण्यात यावा. अन्यथा सलून कारागिरांच्या उपजीविकेची उपलब्धता करून द्यावी. असे न घडल्यास नाभिक समाज आत्महत्या करेल या प्रकारणास सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार असणार आहे अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले आहे.
--
चौकट
--
आज महाराष्ट्र राज्यात ५५ लाख नाभिक समाज असून जवळपास ९५ टक्के दुकाने ही भाडे तत्वावर आहेत. आजपर्यंत शासन दरबारी या सलून व्यावसायिक धारकांच्या बाबतीत एकही मागणी राज्य शासनाने पूर्ण केल्या नाहीत. मग राज्यात लॉकडाऊन करताना प्रथम हाच समाज का शासनाला दिसतो. बंदला आमची काहीच हरकत नाही परंतु या समाजाच्या उपजीविकेची मागणी पूर्ण करा, नंतर दुकाने बंद ठेवा. आज समाजात संतापाची लाट उसळली असून या समाजाला टार्गेट करून आमच्या बाबत जर कठोर निर्णय घेतल्यास हा नाभिक समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
- नीलेश पांडे
अध्यक्ष, पुणे जिल्हा नाभिक संघटना)
--
फोटो क्रमांक : ०६खोर नाभिक समाज आंदोलन
फोटोओळ : राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे आज दौंड तालुक्यातील नाभिक समाज राज्य शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरला गेला असून या संदर्भात दौंड तहसीलदार संजय पाटील यांना दौंड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने निवेदन देताना तालुकाध्यक्ष गणेश साळुंके.