पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्याकलादालनात तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालगंधर्व व्यवस्थापनानेही हा सर्व प्रकार पाहता त्याचे प्रदर्शन अचानक बंद केले आहे. अक्षय माळी असे या कलाकाराचे नाव आहे. बालगंधर्व कलादालनात तीन दिवस प्रदर्शन पाहायला मिळणार होते. व्यवस्थापनाने कोणाच्या तरी दबावाखाली राहून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास बंदी केली असल्याचे अक्षयने लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
अक्षय माळी हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्याने पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफी मधून शिक्षण घेतलं आहे. पुण्यात आतापर्यंत न्यूड फोटोग्राफिचे प्रदर्शन कधी झाले नाही. समाजाचा न्यूड फोटोग्राफी अथवा चित्रकला याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलण्यासाठी अक्षयने ही नवीन संकल्पना आणली होती. पण ही कला वाईट आहे. असे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या काहींनी आंदोलनाची धमकी देत हे प्रदर्शन बंद पाडल्याचे अक्षयने सांगितले आहे.
रवी जाधव दिगदर्शित न्यूड या मराठी चित्रपटात विवस्त्र कपड्यातील व्यक्तीचे चित्र काढण्याची कला दाखवण्यात आली आहे. त्यावर समाजात अनेकांनी टीकाही केली. ही कला असली तरी चित्रपटातून असे काही दाखवून तुम्ही संस्कृतीवर घाला आणण्याचे काम करत आहात. अशी वक्तव्य करण्यात आली. परंतु चित्रपट पाहून झाल्यावर त्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड गप्प होते. एखाद्या कलेकडे पाहण्याच्या माणसाचा दृष्टिकोन कसा आहे. यावरच त्या कलेला महत्व दिले जाते. त्याप्रमाणेच आधुनिक युगातही न्यूड फोटोग्राफीकडे कलेच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. तरुणाई स्कुल ऑफ फोटोग्राफीमधून शिक्षण झाल्यावर या क्षेत्राकडे वळताना दिसून येत आहे.
कोणी प्रदर्शन पाहू नये म्हणून चित्रे उलटी केली
सात जानेवारीला मी हे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले होते. त्यानंतर ८,९ असे तीन दिवस ते सुरु राहणार होते. पण पहिल्याच दिवशी एका अज्ञात नंबरवरून मला फोन आला. ''हे असलं प्रदर्शन दोन मिनिटात बंद करा, अन्यथा आंदोलन केले जाईल'' अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा दुसऱ्या दिवशी पासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही. आता सध्या मी लावलेली सर्व चित्रे उलटी करून ठेवण्यात आली आहेत. कोणी प्रदर्शन पाहायला आले तर हास्यास्पद दिसत आहे. मी याबद्दल कुठेही तक्रार करणार नाही. आज शेवटचा दिवस थांबून सायंकाळी प्रदर्शन काढणार असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले आहे.
न्यूड फोटोग्राफी ही माझी कला
न्यूड फोटोग्राफीबद्दल माझ्या मनात ज्या नवे विचार, कल्पना येतात. त्या मी फोटोग्राफीसारख्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी कितीही टीका केली अथवा धमकी दिली तरी माझी कला बंद करणार नाही. आणि धमक्यांना उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाही असेही तो यावेळी म्हणाला आहे.
''न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन आहे हे आम्हाला तरुणाने सांगितले नाही. त्यामध्ये त्याची वैयक्तिक छायाचित्रे होती. आजपर्यंत बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात असे प्रदर्शन कधी भरविण्यात आले नाही. तुम्ही आता असे प्रदर्शन भरविणार का? असे लोक विचारायला लागले. त्या तरुणाला पोलीस परवानगी आणण्यास सांगितले होते. पण त्याने ती आणली नाही म्हणून प्रदर्शन बंद करायला लावले असल्याचे बालगंधर्वचे प्रमुख व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले.''