पुणे : कोरोनामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या पुणे शहरात १९ तारीख मंगळवारचा दिवस मोठा दिलासादायक चित्र घेऊन आलेला आहे. ज्या शहरात कोरोनाबाधितांच्या सक्रिय रूग्णांचा आकडा सुमारे ५० हजाराच्या पुढे गेला होता, त्याच शहरात आज सक्रिय रूग्ण संख्या अवघ्या ९९४ वर आली आहे. पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट असून, शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा बहुतांशी प्रमाणात कमी झाल्याचे हे द्योतक आहे.
कोरोना संसर्गाविरूध्द निर्माण झालेली सामुहिक प्रतिकार शक्ती, मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण व योग्य वेळी मिळणाऱ्या शाश्वत वैद्यकीय सुविधा, यामुळे पुणे शहरातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची टक्केवारीही गेल्या कित्येक महिन्यांपासून १.८० टक्क्यांपेक्षा अधिक गेलेली नाही. तसेच कोरोनाबाधितांची टक्केवारीही २ टक्क्यांच्यावर गेलेली नाही. तर दुसरीकडे गेल्या तीन-चार महिन्यांपासून दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या १५० च्या वर गेली नाही. विशेष म्हणजे काही वेळेस हा आकडा शंभरीच्या आतच राहिला असून, कोरोना आपत्तीचा प्रभाव वाढल्यापासून पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी रूग्ण संख्या सोमवारी (दि़१८) ७० इतकी खाली आली होती. यापूर्वीही शहरात शनिवारी (दि.१६) ८४ रुग्ण, ११ ऑक्टोबरला ८६ व तत्पूर्वी २० सप्टेंबरला ८६ रुग्ण आढळून आले होते.
दीड वर्षानंतर सक्रिय रूग्ण संख्या ९९४
दिवसेंदिवस नवीन रूग्णांची कमी होणारी संख्या व कोरोनावर यशस्वीरित्या मात करून कोरोनामुक्त होणाऱ्यांचा वाढलेला आकडा हे शहराच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. कोरोना आपत्तीतील गेल्या दीड वर्षांतील शहरातील सर्वात कमी सक्रिय रूग्णसंख्या आज नोंदविली गेली असून, यापूर्वी २७ एप्रिल,२०२० रोजी आजच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ९६६ सक्रिय रूग्ण होते. त्या दिवसानंतर म्हणजे दीड वर्षांनंतर हा आकडा ९९४ वर आला आहे.
कोरोना चाचणी व बाधितांची सद्यस्थिती
* शहरात आजपर्यंत झालेल्या कोरोना चाचण्या : ३४ लाख ८८ हजार ८५१* कोरोनाबाधितांची एकूण संख्या : ५ लाख ३ हजार ३५७ * कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या : ४ लाख ९३ हजार २९६* कोरोनामुळे एकूण मृत्यू : ९ हजार ६७
कोरोना आपत्तीवर पुणेकरांची यशस्वी मात : महापौर ''कोरोनाबाधितांच्या संख्येत देशात सर्वाधिक असलेल्या पुणे शहराने आज कोरोनावर यशस्वीरित्या मात करून दाखविली आहे. पन्नास हजारांच्या पुढे सक्रिय रूग्ण संख्या गेलेल्या पुणे शहरात आज हा आकडा ९९४ वर आला ही पुणेकरांसाठी मोठी आनंददायी बाब आहे. पुणेकरांनी घेतलेली दक्षता, मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण, आरोग्य यंत्रणांचे प्रयत्न यांचा हा एकत्रित परिणाम असून, आपण लवकरच कोरोनावर पूर्णपणे मात करू असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.''