लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही अपेक्षित प्रमाणात कमी झालेले नाही. यामुळेच शासनाने यंदाही पाय पालखी सोहळ्यास परवानगी दिलेली नाही. परंतु विश्वस्त व वारकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढविण्यात येणार असून, प्रस्थान सोहळ्यादरम्यान अश्वांना देखील परवानगी देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या पालखी सोहळा आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याची चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा देखील एस.टी बसनेच पालख्या विठ्ठलाच्या भेटीला जाणार आहेत. शासनाने देहू आणि आळंदी येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास शंभर लोकांची उपस्थितीची परवानगी दिली आहे. विश्वस्त आणि वारकरी यांनी पाय पालखी सोहळ्याचा आग्रह धरला आहे, पण पाय पालखी सोहळ्यास परवानगी दिली नाही, तर इतर काही मागण्या केल्या आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली. पालखी प्रस्थान सोहळ्यास शंभर ऐवजी आणखी काही लोकांना उपस्थित राहण्यास, पालखी सोबत ६० लोकांऐवजी आणखी चार-पाच लोकांना जाण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. तसेच पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पारंपारिक अश्वांना सहभागी करून देण्यावर देखील सकारात्मक चर्चा झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.