आंबेगाव तालुक्यात १२ एप्रिलअखेर ७ हजार ५६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६ हजार ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १२८ रुग्णांचा दुर्दुैवी मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोविडची सेवा देणाऱ्या आस्थापनामध्ये ११५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची संख्या १६ आहे. तालुक्यात आयसीयू बेडची संख्या ३४ आहे. अन्य बेडची संख्या ११० आहे. प्रशासनातर्फे जसे रुग्ण बरे होऊन घरी पाठवले जात आहे, तसे अन्य नवीन आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करत आहेत. अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालय अवसरी खुर्द येथे ४७५ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मंचर, भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल वडगाव काशिंबेग, संजीवन हॉस्पिटल मंचर, गुजराती हॉस्पिटल मंचर, मंचर सिटी हॉस्पिटल मंचर, मातोश्री हॉस्पिटल मंचर, आधार हॉस्पिटल पारगाव या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचाराची सोय उपलब्ध आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून अजूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.