पुणे : लॉकडाऊनपूर्वी कर्करोगाच्या निदान चाचण्या करण्या-या व्यक्तींची संख्या अधिक होती. मात्र त्यानंतर या संख्येत घट झाली असून भीतीपोटी नागरिकांनी तपासणी करणे तसेच रुग्णालयांना भेट देणे टाळल्याचे दिसून आले. कर्करोगाच्या त्वरित निदानासाठी पॅप स्मीयर, मौखिक तपासणी, मॅमोग्राफी आणि इतर रक्त चाचण्यांसारख्या नियमित आरोग्य तपासणीची टाळाटाळ न करता वेळीच या चाचण्या केल्याने आजारापासून दूर राहण्यास मदत होते. निदानास विलंब झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता प्रतिबंध, लवकर निदान आणि त्यावर उपचार करण्याचे एक मोठे आव्हान आहे. खाण्याच्या सवयी, प्रदूषण, रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणे, मद्यप्राशन किंवा तंबाखूचे सेवन अशी कर्करोगाची अनेक कारणे आहेत. वेळीच तपासणी केल्याने विशिष्ट कर्करोग किंवा कर्करोगापूवीर्ची लक्षणे ओळखण्यास मदत होते.
डॉ. संजय इंगळे म्हणाले की, पुरुषांमध्ये मौखिक आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तर स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाचा शोध घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. पॅप स्मीयरसारखी चाचणी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान करण्यात मदत करेल. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ओव्हेरीयन कार्सिनोमा शोधण्यासाठी सीए १२५ ही चाचणी करता येते. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नियमित मॅमोग्राफी करुन घ्यावी. धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करणा-या पुरुषांनी दर ६ महिन्यांनी मौखिक आरोग्याची तपासणी करावी. ४० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांनी दर वर्षी प्रोस्टेट-स्पेसिफिक अँन्टीजेन (पीएसए) चाचणी न चुकता करावी.
चौकट
“लॉकडाऊनपूर्वी सुमारे ३० टक्के लोकांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घेतल्याचे दिसून आले. आता आणि लॉकडाऊननंतर केवळ ८ % व्यक्तींनीच कर्करोगाची तपासणी करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. लॉकडाऊनपूर्वी सुमारे १० ते १५ महिला पॅप स्मीयर चाचणीसाठी येत होत्या. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे केवळ १-२ महिलांनीच चाचण्या केल्याचे आढळून आले आहे. जानेवारी २०२१ मध्ये दररोज ५ ते ७ रुग्ण पॅप स्मीयर चाचणीसाठी येत आहेत.”
- डॉ. संजय इंगळे, कर्करोगतज्ञ