पुणे : राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळणारे शहर म्हणून गणले गेलेल्या पुणे शहरात (महापालिका हद्दीत) बुधवारी उच्चांकी कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, हा आकडा १६ हजार १८५ इतका आहे. तर यामध्ये तब्बल ३ हजार ५०९ एवढे कोरोनाबाधित आढळून आले असून तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २१.८० टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही २६ हजार ५१५ इतकी झाली आहे. सध्या शहरात ५८९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून १ हजार ४४ आॅक्सिजनसह उपचार घेत आहेत.
तसेच, बुधवारी सायंकाळपर्यंत १ हजार ४१० जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
शहरात आजपर्यंत १३ लाख ६६ हजार १८४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ४३ हजार ३४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख १२ हजार ७१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ११४ इतकी झाली आहे.
=====