विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व महाविद्यालयांना मूल्यांकन करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उच्चशिक्षण विभाग व विद्यापीठाकडूनही महाविद्यालयांना मूल्यांकनाबाबत मार्गदर्शन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाने मूल्यांकन करून घेतले आहे. दरवर्षी राज्यातील सुमारे २०० महाविद्यालयांकडून मूल्यांकन करून घेतात. परंतु, मागील वर्षी केवळ ५० महाविद्यालयांनीच मूल्यांकनासाठी अर्ज केल्याचे दिसून येते आहे, असे उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नॅक मूल्यांकन केलेल्या आणि नॅककडून ‘ए’ ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयांना केंद्र शासनाकडून व विद्यापीठांकडून विविध योजनांतर्गत निधी प्राप्त होतो. तसेच महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी सुद्धा नॅककडून मिळालेला ग्रेड विचारात घेतला जातात. परंतु, मूल्यांकन करून घेणाऱ्या महाविद्यालयांची संख्या घटल्याने अनेक शैक्षणिक अडचणी निर्माण होणार आहेत.
नॅक मूल्यांकनासाठी शैक्षणिक संस्थेच्या एकूण कामगिरी बरोबरच प्राध्यापकांचे संशोधन, विद्यार्थ्यांची प्रगती आदी घटक विचारात घेतले जातात. तसेच नॅक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका महाविद्यालयाला सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. कोरोना काळात अनेक शैक्षणिक संस्थांचे आर्थिक परिस्थिती बिघडले आहे. त्यामुळे सुद्धा काही महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेण्यास अर्ज केला नसावा. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे झालेला बदल लक्षात घेऊन नॅकेने मूल्यांकन नियमावलीत काही बदल करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
----------------
कोरोनामुळे प्राध्यापकांना संशोधनासाठी भरपूर अवधी उपलब्ध होता. काही प्राध्यापक महाविद्यालयात येऊन प्रशासकीय कामकाज पूर्ण करत होते. त्यामुळे नॅक मूल्यांकनासाठी सामोरे जाण्यास महाविद्यालयांना फारशी अडचण येणे अपेक्षित नाही. परंतु, कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर झालेले परिणाम लक्षात घेऊन नॅकेने मूल्यांकनाच्या नियमावलीत आवश्यकतेनुसार बदल करायला हवेत.
- डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ