लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीच्या दुसऱ्या लाटेत पन्नास हजारांच्या पुढे गेलेली शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या साधारणत: दीड महिन्यानंतर शुक्रवारी (दि. ४) पाच हजारांच्या आत आली. आजमितीला शहरात ४ हजार ८४२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून, यापैकी सुमारे ६० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
आज दिवसभरात नव्याने ३४९ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६९९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले. दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८७१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.४३ टक्के इतकी आहे. आज ३३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील असून. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७७ टक्के इतका आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार ३७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ७२१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख २६ हजार २२१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ४ लाख ७१ हजार ५७७ जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी ४ लाख ५८ हजार ३७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------