पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एका दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये १०५ भर पडली. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बारामती तालुक्यात राबविण्यात आलेल्या अत्यंत कडक उपाययोजनामुळे हा तालुका कोरोना मुक्त झाला आहे. परंतु पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, ही वाढती संख्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळेच पुढील तीन दिवस शहरातील कोरोना प्रभावित क्षेत्रात अत्यंत कडक निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले. पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता १७०० वर जाऊन पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण ९२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. दरम्यान बरे होऊन घरी गेलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ३०९ झाले आहेत.
पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड हजारांवर पोचला असून गुरुवारी दिवसभरात ८६ रूग्णांची भर पडली. शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ५१८ पर्यंत पोचली आहे. दिवसभरात एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ६० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. कोरोनाचा शहरातील संसर्ग वाढत चालला आहे. शहरातील रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्यात साडे पाचशे रूग्णांची भर पडली आहे. रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. गुरुवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०४, नायडू रुग्णालयात ७४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ०८ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरात गुरुवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. यातील दोन जण पुण्यातील आहेत. तर, खडकी, इंदापूर आणि कोल्हापूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८८ झाली आहे. एकूण ४४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २७४ झाली आहे.------पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती पुणे जिल्हा एकूण रूग्ण : १७००एकूण मृत्यु झालेले रूग्ण : ९२बरे होऊन घरी गेलेले रूग्ण : ३०९____ पुणे शहर : १५०५पिंपरी चिंचवड : ११३ पुणे ग्रामीण : ८२