धायरी: सिंहगड रस्ता परिसरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारपर्यंत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आत्तापर्यंत १५,७९४ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ८१२ ॲक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत ३४८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर १४,६३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये सिंहगड रस्ता परिसरात वाढणारा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता रोजच्या होणाऱ्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भागातील लोकसंख्येचा विचार करता या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांची संख्यादेखील वाढवणे गरजेचे आहे. सध्या सिंहगड रस्ता परिसरात लायगुडे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यान अशा दोन ठिकाणी फक्त चाचण्या केल्या जातात. स्व. लायगुडे रुग्णालयात तर काही रुग्णांना किट संपल्याचे सांगून उद्या या ,असेही सांगण्यात येत आहे.सिंहगड रस्ता परिसरात विद्यार्थी,कामगार आणि इतर भागातून-गावातून ये-जा करणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर सध्या खूपच कमी प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी, याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात आल्याचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी सांगितले.
------------------
प्रभाग क्रमांक ३३ मध्ये असणाऱ्या स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालयात दररोज फक्त ५० जणांची आरटीपीसीआर घेतली जाते. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
- राजाभाऊ लायगुडे, विद्यमान नगरसेवक
-----------------
फोटो ओळ: स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालयामध्ये स्वॅब टेस्टची संख्या वाढविण्याची मागणी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी आरोग्यप्रमुख आशिष भारती यांच्याकडे केली.