खेड तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांसाठी चांडोली येथील समाजकल्याणचे वसतिगृह आणि म्हांळुगे येथे म्हाडामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आता चांडोली कोविड सेंटर एक महिन्यापूर्वी बंद करण्यात आले होते ते पुन्हा चालू करून स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे..तर म्हाळुंगे कोविड केअर सेंटरच्या म्हाडा इमारती खाली करण्यास सांगण्यात आल्याने कोविड सेंटर पर्यायी जागा उपलब्ध करण्यास महसूल आरोग्य प्रशासनाकडून अद्यापही याबाबत हालचाली नाहीत. तालुक्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे तालुक्यातील स्वॅब तपासणी बंद करू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबरोबरच लग्न सोहळ्याला होणारी गर्दी पहाता रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली होती. तालुक्यात १ फेब्रुवारीनंतर रुग्णवाढीचा आलेख दररोज कमी-जास्त होताना दिसत आहे. नागरिकांच्या मनातील कोरोना विषाणूची भीती आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र तालुक्यात आहे. सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरणे कमी झाले आहे. सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे, यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कागदोपत्री २०६ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्यस्थितीला तालुक्यातील ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात दररोज १० ते १५ पर्यंत नवीन कोरोनाबाधित व्यक्ती आढळत असल्याने तालुक्यात पुन्हा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील काही दिवसात तालुक्याची नव्याने बाधित संख्या १०० वर पोहोचली आहे. तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये मात्र याबाबत जागरूकता नसल्याने संख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे असून सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास अंगावर काढू नये, त्वरित डॉक्टरांना भेटावे. चांडोली स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे.
बळीराम गाढवे (तालुका वैद्यकीय अधिकारी, खेड )
.