नारायणगाव : - केंद्राच्या अहवालानुसार १२ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार आहे, नागरिकांनी लॉकडाऊन संकट टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी नारायणगाव येथील संपर्क कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम , इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरीचे अध्यक्ष डॉ. सदानंद राऊत , सभापती विशाल तांबे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, केंद्राने जाहीर केलेल्या कोरोना संदर्भातील अहवालानुसार रुग्णसंख्या वाढल्यास पुणे जिल्ह्यात ३७६ व्हेंटिलेटरची कमतरता भासेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड रुग्णामध्ये नवीन पद्धतीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या नव्या कोविडची लक्षणे लहान मुले व तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहे. या नवीन कोविडमुळे रुग्णाच्या फुफुसावर जास्त प्रभाव पडतो व रुग्ण अत्यावस्थेत जातो असे नवीन संशोधनात आढळून आले असल्याने सर्व नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
व्यावसायिकांनी मास्कबरोबरच फेसशिल्डचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे. ४५ वयोगटांपुढील सर्वांनी कोरोना लस घ्यावी, लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशा भ्रमात राहून नये, सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाचे नियम पाळावेत असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. १८ वर्षांपुढील युवकांना लस द्यावी अशी केंद्राकडे मागणी केली आहे.
ओझर येथील कोविड सेंटर सुरू होणार
कोविड रुग्णांनी होम आयसोलेशन न राहता कोविड सेंटर अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे . ओझर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार आहे. तालुक्यात ६२० बेडची सुविधा असून २५६ रुग्ण उपचार घेत आहेत अशी डॉ. कोल्हे यांनी दिली.
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सात्यत्याने आपला प्रयत्न सुरू असून केंद्राकडून त्यामागणी संदर्भात साकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नारायणगाव व खेड बायपास सुरू झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.