पुणे : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये घर्षणामुळे, शॉर्ट सर्किटमुळे किंवा तात्कालिक कारणांमुळे आगी लागण्याच्या घटना वाढतात. परंतू, गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या घटना कमी झाल्याचे अग्निशामक दलप्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात (2019) एकूण 4 हजार 911 कॉल आले होते. तर, 2018 साली 5 हजार 14 घटना घडल्या होत्या. यामध्ये किरकोळ आग, मोठ्या प्रमाणावरील आग, शॉर्ट सर्किट, गॅस लिकेज, कचरा जाळणे, ऑईल लिकेज, झाडपडी, घरे पडणे, घरात पाणी घुसणे, लिफ्ट बंद पडणे, दार आपोआप लॉक होणे, रस्ते अपघात, पाण्यात बुडण्याच्या घटना, साप निघणे, प्राणी-पक्षी सुटका, जळीतकांड, स्पेशल रेस्क्यू आदींचा समावेश आहे. यातील किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या आगीच्या घटना 1463 होत्या. चालू वर्षात जानेवारीमध्ये 137, फेब्रुवारीमध्ये 207 तर मार्चमध्ये 214 घटना घडल्या आहेत. आगीच्या घटनांची आकडेवारी पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाल्याचे रणपिसे म्हणाले.घरामध्ये आग लागणे, गॅस लिक होणे, शॉर्ट सर्किट होणे आदी घटनाही घडतात. परंतू, सध्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरीच आहेत. व्यापारी आस्थापना बंद आहेत. त्यामुळे विजेचा वापर कमी झालेला आहे. त्यामुळे व्यापारी आस्थापनांमधील आगीच्या घटना अत्यंत कमी झाल्या आहेत. परंतू, नागरिक घरीच असल्याने घरगुती विजेचा वापर वाढलेला आहे. एकाच प्लगवर अनेक उपकरणे लावली जात आहेत, अनेकदा घरांमधील वायरिंग जुने झालेले असल्याने किरकोळ शॉर्ट सर्किटच्या घटना घडत आहेत. नागरिक घरीच असल्याने टीव्ही, पंखे, संगणक आदी उपकरणांचा वापर जास्त वाढला आहे. असे असले तरी नागरिक अधिक सतर्क राहून काळजी घेत असल्याचे दिसते आहे.सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांसह व्यावसायिक प्रदर्शनांमध्ये आगीचा धोका अधिक असतो. वास्तविक अशा ठिकाणी सावधगिरीही बाळगली जाते. परंतू, सध्या अशा प्रकारचे सामुहिक कार्यक्रम बंदच असल्याने या घटनाही कमी झाल्या आहेत. नागरिकांची रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचरा पेटविण्याच्या घटना जवळपास बंदच झाल्या आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत पुणे शहरातील आगीच्या घटना घटल्या; लॉकडाऊनचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:27 PM
किरकोळ शॉर्ट सर्किटच्या घटना अधिक
ठळक मुद्देसांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांसह व्यावसायिक प्रदर्शनांमध्ये आगीचा धोका अधिक