पुणे : फेसबुक, आॅर्कुट, टिष्ट्वटर या माध्यमासह प्रत्येक तंत्रज्ञानाला लोकांनी प्रथम नाकारले. या माध्यमांशी जुळवून घेण्यात लोकांना सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु, नावे ठेवणारीच माणसेच तंत्रज्ञानाच्या वापरात आज आघाडीवर आहे. तंत्रज्ञानामुळे चांगले, वाईट परिणाम होत असतात. त्यात तंत्रज्ञानाच्या चांगल्या परिणामांची संख्या निश्चितच जास्त आहे. पण, आपल्याकडे तंत्रज्ञानाला खूप लवकर नावे ठेवली जातात, असे मत अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले. करम संस्थेतर्फे स्पृहा जोशी यांना ‘करम तेज’ पुरस्कार ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात गझलकार सुप्रिया जाधव आणि कवी शांताराम खामगावकर यांच्या अनुक्रमे कोषांतर व भवताल या गझलसंग्रह व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कैलास गायकवाड, भूषण कटककर, अॅड. प्रमोद आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी म्हणाल्या, की तंत्रज्ञानामुळे माणसे जवळ आली. त्यांच्यातला संवाद वाढला. एकमेकांच्या चुका, कमतरतांसह सुख-दु:खदेखील समजण्यास खूप मदत झाली. याचा उत्तम अनुभव कवितेच्या क्षेत्रातून गझलेच्या प्रांतात प्रवेश केल्यावर जवळून आला. मनात दडलेला विचांराचा ऐवज असह्य झाल्यावर कवितांचा जन्म होतो. कवितांच्या व्यक्त होण्याला मर्यादा नाही. अभिनय व कविता या दोन्ही क्षेत्रात वावरताना माझ्यातील प्रचंड ऊर्जेला व्यक्त करण्यासाठी कविता हे अप्रतिम समांतर माध्यम आहे. मिळणारे पुरस्कार हुरुप व प्रेरणेसोबत वाढलेल्या जबाबदारीची जाणीवही करून देतात.मराठी गझल मुशायरा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात वैभव कुलकर्णी, भूषण कटककर, प्रमोद खराडे, सुप्रिया जाधव, शांताराम खामगावकर, अमोल शिरसाठ, डॉ. कैलास गायकवाड, विजय वडेराव सुनीती लिमये आदींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात प्रथमच स्पृहा जोशी यांनी गझल सादर केली. त्याला उपस्थितांनी मुकर्रम, आदाब, अर्ज है अशी उत्स्फूर्त दाद दिली.
चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.