पुणे : शहरातील कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असून गेल्या आठवड्यात तब्बल २० हजार ५४६ रुग्ण वाढले आहेत. त्या तुलनेत कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण मात्र कमी असून आठवड्याभरात १३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकांना दाराआड बसावे लागले होते. जून ते सप्टेंबरचा काळ सर्वाधिक कठीण काळ होता. सप्टेंबरमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविली गेली होती. ऑक्टोबरनंतर ही रुग्णसंख्या कमी होत गेली. जानेवारीपर्यंत रुग्ण घटत गेले होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. गेल्या दीड महिन्यात सक्रिय रुग्णांचा आकडा २९ हजारांच्या पुढे गेला आहे.
पालिकेने तयार केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार १८ मार्च ते २४ मार्च या कालावधीदरम्यान शहरात २० हजार ५४६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ८ हजार ९२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ मार्च ते २४ मार्च या कालावधीदरम्यान सर्वाधिक वाढ ही २४ तारखेला नोंदविली गेली आहे.