लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. त्यांना ऑक्सिजन कसा पुरवायचा, हा प्रश्न महापालिकेसमोर आहे. त्यामुळे नियोजित केलेले तीनशे ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्याचे काम पुढे गेले आहे.
रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजन पोहचला नाही तर त्या रुग्णालयातील रुग्ण अन्य कुठल्या रुग्णालयात हलविता येतील या पर्यायाचाही विचार करून ठेवावा लागत आहे.
----------
चौकट
आणखी दहा टन ऑक्सिजनची गरज
महापालिकेने ईएसआय रुग्णालय, जम्बो रुग्णालय, गणेश कला क्रीडा केंद्र, पठारे स्टेडियम येथे नियोजित तीनशे ऑक्सिजन बेड वाढविण्याची कार्यवाहीही तुर्तास थांबविली आहे़ पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास ते कार्यान्वित करण्यात येतील, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे़ शहराला आणखी दहा टन ऑक्सिजन दिवसाला मिळाला तर हे बेड कार्यान्वित होऊ शकतील, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली़
भारत इलेक्ट्रॉनिक्सची १० दहा टनाचा प्रकल्प सुरू करण्याची तयारी
पाषाण येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने दहा टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी दाखविली आहे. एकाच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती करून तो शहरातील इतर भागांतील रुग्णालयात पुरविता येऊ शकतो का याचाही विचार चालू असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले़ स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ऑक्सिजन निर्मिती करण्याचाही विचार सुरू आहे.
--------------------------------