प्रज्ञा केळकर - सिंग
पुणे : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोजची रुग्णसंख्या २५०-३०० वरून आता ५००० च्या घरात पोहोचली आहे. १० जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात १ लाख २९ हजार २३३ चाचण्या झाल्या. त्यापैकी ३३ हजार ५१४ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे शहराचा सरत्या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २५.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळाला होता. तब्बल आठ महिने रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या अचानक वाढू लागली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येने १००० चा टप्पा ओलांडला. त्यानंतर दररोज रुग्णसंख्येमध्ये ४५०-५०० ची वाढ होऊ लागली. आता रुग्णसंख्येने ५००० चा टप्पाही ओलांडला आहे.
२६ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात केवळ १७२४ रुग्णांची नोंद झाली होती. त्या आठवड्यात शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ४.०३ टक्के इतका होता. २ जानेवारी ते ९ जानेवारी या एका आठवड्यात शहरात ८६ हजार ६६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११ हजार ३८९ कोरोनाबधित आढळून आले आहेत. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १३.१४ टक्के इतका नोंदवला गेला होता.
एकीकडे कोरोनाबधितांची वाढती संख्या आणि दुसरीकडे ओमायक्रॉनचा प्रसार अशा दुहेरी संकटाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल आणि फेब्रुवारी महिन्यापासून लाट ओसरू लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
शहरात आतापर्यंत ४१ लाख ६ हजार ६१४ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी ५ लाख ५९ हजार ५४९ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यापैकी ५ लाख १६ हजार २२१ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत शहरात ९१४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३.७१ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, ९६.२९ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
रविवारी ५३७५ कोरोनाबाधित
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रविवारी पुण्यात १९ हजार ११९ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी ५३७५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले, तर ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या २२ रुग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर २४ रुग्ण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. २१७ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरात ४८८ व्हेंटिलेटर बेड आणि ३९७० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ३०९० रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३४ हजार १८७ इतकी आहे.
कालावधी रुग्णसंख्या पॉझिटिव्हिटी रेट
२६ डिसें-१जाने १७२४ ४.०३
२-९ जाने ११,३८९ १३.१४
१०-१६ जाने ३३,५१४ २५.९३