लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात मार्च एप्रिल महिन्याची तुलना करता मे महिन्याच्या प्रारंभापासून चाचण्यांचे प्रमाण घटले असले तरी, दिवसाला ते सरासरी १६ ते १८ हजारांच्या दरम्यान आहे. शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असून, पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा सात हजारांपर्यंत गेला होता. त्यावेळी साधारणत: २५ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी दर होता, तो आजमितीला २१.६ पर्यंत खाली आला आहे. दरम्यान आज चाचण्यांचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाले असले तरी, कोरोनाबाधितांची संख्याही तीन हजाराने कमी होऊन चार हजाराच्या आत आली आहे. सध्यस्थितीला शहरातील चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण साधारणत: २१.६ टक्क्यांवर आहे.
कोरोना संसर्ग झाला आहे की हे तपासणीसाठी ७० टक्के चाचण्या या ‘आरटीपीसीआर’ व्दारे तर ३० टक्के चाचण्या या अॅण्टीजेन रॅपिडव्दारे करण्यात येत आहेत. रुग्णांची गरज व त्याची लक्षणे पाहून कोणत्या पध्दतीने कोरोनाची चाचणी करायची याचा निर्णय घेतला जातो. अनेकवेळा रुग्ण थेट रूग्णालयात दाखल होतात त्यावेळी तात्काळ चाचणी करून, अहवाल प्राप्तीसाठी अॅण्टीजेन रॅपिड टेस्ट उपयोगी पडते. परंतु, काही वेळेत लक्षणे असूनही अॅण्टीजेन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह येत असतो, त्यामुळे अशा रुग्णांची पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी घेण्यात येते.
---------------------
शहरातील चाचण्या, रुग्ण व पॉझिटिव्हिटी दर
तारीख चाचण्या रूग्ण पॉझिटिव्हिटी दर
१ एप्रिल२०,६३१४,१०३१९.८३
८ एप्रिल२३,५९३७,०१०२९.७०
१५ एप्रिल२१,९२२५,३९५ २४.६०
२१ एप्रिल२४,४०९५,५२९२२.६५
२८ एप्रिल२०,२७७३,९७८१९.६१
१ मे १९,३३६४,०६९२१.०४
२ मे १६,६१०४,०४४ २४.३४
३ मे १२,२७६२,५७९२१.००
४ मे १५,०९८२,८७९ १९.०६
-----------------
आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह
‘आरटीपीसीआर’ व्दारे करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी ही अॅण्टीजेन चाचणीच्या तुलनेत अधिक अचूक असते. शंभर कोरोनाबाधित संशयितांची ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी केली तर यामध्ये ६५ ते ७० टक्के रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतात. तर अॅण्टीजेनमध्ये अचूकतेचे प्रमाण हे ५० टक्केच आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या अॅण्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह अहवाल आला तर त्या रुग्णास पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी करण्यास सांगण्यात येते.
----------------------